गोळीबारप्रकरणी एकास न्यायालयीन कोठडी
By admin | Published: July 6, 2017 12:04 AM2017-07-06T00:04:31+5:302017-07-06T00:04:31+5:30
दुसऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ
मलकापूर : येथील मुख्याध्यापकावर गोळी झाडल्याप्रकरणी अटकेतील दोघांपैकी एका आरोपीस न्यायालयीन कोठडी तर दुसऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात घटनाक्रम असा की, येथील रहिवाशी तथा मोताळा तालुक्यातील भिकमसिंह गुलाबसिंह राजपूत यांच्यावर त्यांच्या घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रतापनगरमधील राहत्या घरासमोर मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांपैकी एकाने गोळी झाडल्याची घटना २८ जून रोजी रात्री १०.४० वा. घडली.
त्यात २९ जून रोजी पोलिसांनी सावनसिंह मदनसिंह राजपूत यास अटक केली. त्यास अनुक्रमे चार दिवस मग एक दिवस असे पाच दिवस पोलीस कोठडीचे आदेश दिल्यानंतर आज ५ जुलै रोजी सावनसिंह मदनसिंह राजपूत यास न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी दुसरा आरोपी संदीप ऊर्फ नाना ओंकार येसी याला पोलिसांनी ३ जुलै रोजी अटक केली. त्याला ४ रोजी एका दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश तर आज ५ जुलै न्यायालयाने संदीप ऊर्फ नाना ओंकार येसी याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करून त्यास ८ जुलै १७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी दिली आहेत.