साहेब, कोरोनाने नव्हे तर पीपीई किटने मरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:23+5:302021-04-02T04:36:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पीपीई किटचाही वापर वाढला आहे. मात्र, या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पीपीई किटचाही वापर वाढला आहे. मात्र, या किटचा अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अशातच तापमानाचा पारा वाढल्याने पीपीई किट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही.अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना कोरोना नव्हे, तर पीपीई किटच जीवघेणी ठरत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई किटचाही वापर वाढला आहे. कोविड वॉर्डात रूग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यासह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई किट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई किट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही.
दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई किटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही. त्यामुळे पीपीई कीट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला काेरड पडणे, हातापायाला व्रण येणे, चक्कर येणे, युरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने पीपीई किट परिधान करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे.
पीपीई किट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा पारा वाढल्याने या समस्यांमध्ये वाढ झाली असली, तरी वैद्यकीय कर्मचारी रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत.
- डॉ. नीलेश टापरे,
निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव
५०० पीपीई किटचा दररोज होतो वापर