सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:50 PM2020-01-06T14:50:17+5:302020-01-06T14:50:24+5:30
एलईडीवरील आॅनलाइन शिक्षणात विद्यार्थी दंग होत असून काही मुले ‘सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना!’ असा हट्टच धरतात
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : टिव्ही किंवा मोबाईल म्हटलं की, विद्यार्थी लगेच आकर्षित होतात. त्यात दृक-श्राव्य माध्यमाचा ‘इफेक्ट’ त्यांच्या मनावर लवकर पडतो; हीच बाब हेरून मुलांना एलईडीवरून आॅनलाइन शिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा ऊमरा देशमुख येथे राबविला जात आहे. एलईडीवरील आॅनलाइन शिक्षणातविद्यार्थी दंग होत असून काही मुले ‘सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना!’ असा हट्टच धरतात.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक शैक्षणिक पद्धतीतील काही त्रुटींचे निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून आॅनलाइन शिक्षणपद्धतीचे एक नवे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. वेगवेगळ्या वेबसाइटवर विविध अभ्यासक्रम आहेत. या आॅनलाइन अभ्यासक्रमाचा खाजगी शाळाच वापर करत नाहीत; तर जिल्हा परिषद शाळाही यामध्ये अग्रेसर असल्याचे चित्र मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथे पाहावयास मिळते. ऊमरा दे. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत ग्रामपंचायत व लोकसहभागातून दोन एलईडी संच आहेत. या दोन्ही एलईडीचा वापर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केला जातो. पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल एलईडीला लाऊन दिवसातून किमान एक तास आॅनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांची अभ्यासातील रूची वाढविण्यास मदत होत आहे.
मुलांपेक्षा मुली जास्त
कुठल्याही शाळेमध्ये आज मुलांच्या संख्येपेक्षा मुलींच्या संख्या कमीच दिसून येते. परंतू ऊमरा दे. येथील जिल्हा परिषद शाळेत याऊलट चित्र आहे. येथे मुलांची संख्या कमी व मुलींची संख्या अधिक आहे. या शाळेकडून बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेशही वेळोवेळी दिल्या जातो.
कमी जागेत फुलले नंदनवन
या शाळेला तशी जागा अत्यंत कमी आहे. परंतू मुख्याध्यापक संजय हिरगुडे व शिक्षक विठ्ठल गावंडे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन या कमी जागेतच नंदनवन फुलवले आहे. शाळेच्या परिसरात मोगरा, अशोका, मेहंदी यासह विविध प्रकारचे झाडे लावली आहेत. त्यामुळे शाळेचे हे छोटेशे मैदान नेहमी सुशोभित असते.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्या जाते. शाळेसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचेही पूर्ण सहकार्य असते.
-संजय हिरगुडे, मुख्याध्यापक
शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे त्यांचा विद्यार्थींची प्रगती चांगली आहे. उत्तम शिक्षण मिळत असल्याने पालक वर्गामध्येही समाधानाचे वातावरण आहे.
-संतोष लाटे, पालक