साहेब..बांधावरचे वाद सोडवले, आता वाटण्याही करून द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:51+5:302021-07-07T04:42:51+5:30
बांधाच्या वादाचे अनेक प्रकरणे न्यायालयात खितपत पडून आहेत. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे धुरे नामशेष झाले आहेत. पूर्वी बैलांना चारा मिळावा, म्हणून ...
बांधाच्या वादाचे अनेक प्रकरणे न्यायालयात खितपत पडून आहेत. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे धुरे नामशेष झाले आहेत. पूर्वी बैलांना चारा मिळावा, म्हणून धुरे राखून ठेवल्या जायचे. त्यामुळे पावसाचे पाणी व्यवस्थित शेताबाहेर जात होते. आता पाऊस थोडा जरी अधिक झाला तर एका एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणी जाते. परिणामी, वाद उद्भवतात. या वादाने रक्ताची नाती दुरावली, किरकोळ कारणावरून न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गोची झाली. यावर तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गावपातळीवर पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांना विश्वासात घेऊन भांडणाचे मूळ शोधून त्या-त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सवडद, गुंज, वरोडी, जागदरी, मलकापूर पांग्रा, राताळी, साखरखेर्डा, मोहखेड, लोणी लव्हाळा, हिवरा आश्रम, शिंदी हनवतखेड येथे जाऊन सामंजस्यातून किरकोळ वादाला मूठमाती दिली.
'बांधांच्या वादाचे निवारण बांधावर'
बांधावरचे वाद मिटविणे हे काम महसूल विभागाचे असले तरी प्राथमिक तक्रार ही पोलीस ठाण्यातच शेतकरी घेऊन येतात. यामध्ये त्यांचा वेळ, पैसा खर्च होतोच. शिवाय वैरभाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याची दखल घेत ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी 'बांधांच्या वादाचे निवारण बांधावर' या उपक्रमांतर्गत महसूल विभाग आणि गावपातळीवरील संबंधित लोकांना सोबत घेऊन पुढाकार घेतला.
बांधाचे वाद सोडविण्यासाठी आपण सामाजिक हेतूने प्रयत्न केला. हे वाद उद्भवण्याची कारणे अनेक आहेत. वाढत्या लोकसंख्येने क्षेत्रफळ कमी झाले आहे. निसर्गाच्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही, त्यामुळे पेरणीपूर्व वाद टाळण्यासाठी उन्हाळ्यात शेतमोजणी करणे आवश्यक आहे.
-जितेंद्र आडोळे सहा.पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन, साखरखेर्डा.