साहेब आम्हालाही शासकीय सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:49+5:302021-07-16T04:24:49+5:30

बुलडाणा : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांकरिता वारंवार शासनाचा दरवाजा ठोठावा लागत ...

Sir, take us into government service | साहेब आम्हालाही शासकीय सेवेत घ्या

साहेब आम्हालाही शासकीय सेवेत घ्या

Next

बुलडाणा : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांकरिता वारंवार शासनाचा दरवाजा ठोठावा लागत आहे. कोरोना संसर्गात कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. साहेब आम्हालाही शासकीय सेवेत घ्या हो... अशी विनंती या कर्मचाऱ्यांमधून वारंवार करण्यात येत आहे. राज्य शासनाने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डॉक्टर, स्टाफ नर्स, औषध निर्माता, भांडारपाल, डाटा एंट्री ऑपरेटर, कक्ष सेवक, सफाई कामगार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण, ईसीजी तंत्रज्ञ व तत्सम पदांची विहित शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि गुणवत्तेनुसार कंत्राटी व रोजंदारी पध्दतीने भरती केलेली आहे. हे कर्मचारी कोरोनाच्या जीवघेण्या परिस्थितीत आपल्या व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत. कोविड कर्मचारी आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिक निर्वाहन करत असंख्य जीवांचे रक्षण करत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षच झाले आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या...

१) जे कोरोना योध्दे कामावर असताना कोरोना संक्रमित होऊन शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्‍तीला कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

२) कोरोना काळात आपल्या प्राणांची बाजी लावत कर्तव्ये बजावणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे.

३) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्‍ती केलेले सर्व विविध पदांवरील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांस राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत ११ महिन्यांच्या करारावर सामावून घेण्यात यावे.

४) सर्व कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तथा शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कोविड, नॉन कोविड व तत्सम विभागात समावेश करावा.

५) सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे. सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम, समान वेतन श्रेणी लागू करावी.

६) राज्यातील सर्व आरोग्य केंद्रे व दवाखान्यात कायमस्वरूपी कोविड विभाग चालू करावा.

कोरानाचे रुग्ण कमी झाल्यामुळे शासन पुन्हा कोविड केअर सेंटर बंद करून, कोरोना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करीत आहेत. तरीही आम्ही कर्मचारी कोविड रुग्णांना अखंड सेवा देत आहोत. शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करावा. काेविड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले आहे.

- अमोलकुमार गवई, जिल्हाध्यक्ष, कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटना, बुलडाणा

काही कोरोना कर्मचाऱ्यांनी सेवा देत असताना आपले प्राणही गमावले आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत मिळाले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोविड कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.

- डॉ. ऋषिकेश देशमुख, उपाध्यक्ष, कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटना

कोरोना काळात सेवा दिलेले कंत्राटी कर्मचारी : १३००

Web Title: Sir, take us into government service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.