साहेब, आम्हाला मोफत धान्य का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:13 AM2020-05-06T10:13:43+5:302020-05-06T10:14:26+5:30
‘साहेब आम्हाला मोफत धान्य का नाही’?, असा प्रश्न गोरगरीबांकडून वारंवार विचारल्या जात आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लॉकडाउनमध्ये गोरगरीबांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांना तांदूळ, डाळी मोफत वाटप करण्याचे आदेश आहेत. परंतू काही ठिकाणी धान्य वाटपात गोंधळ निर्माण होत आहे. आतापर्यंत मोफत डाळ लाभार्थ्यांना मिळाली नाही. काही शेतकऱ्यांची नावे पुरवठा विभागाच्या यादीत नसल्याने, त्यांनाही धान्यापासून वंचीत रहावे लागते. त्यामुळे ‘साहेब आम्हाला मोफत धान्य का नाही’?, असा प्रश्न गोरगरीबांकडून वारंवार विचारल्या जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातमजूरीवर उदरनिर्वाह असलेल्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीब नागरिक अन्नधान्यापासून वंचीत राहू नये, यासाठी पुरवठा विभागाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तिस पाच किलो मोफत तांदुळ महिन्याला दिल्या जातो. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ३७७ शिधापत्रिकाधारक मोफत धान्याचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकानदारांकडे देण्यात आली आहे. त्या यादीमध्ये शिधापत्रिका असलेल्या काही नागरिकांची नावेच नाहीत. एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारकांना मोफत धान्याचा लाभ मिळत नाही. जिल्ह्यात अशा केशरी शिधापत्रिका धारकांची संख्या ९२ हजार १४२ आहे. त्यामुळे धान्य वितरणावेळी गोंधळ निर्माण होत आहे. शिधापत्रिका असूनही काही नागरिकांना धान्यापासून वंचीत रहावे लागत आहे. धान्य वाटपात होत असलेल्या अनियमीततेच्या तक्रारीही पुरवठा विभागाकडे वांरवार येत आहेत.
९१ टक्के वाटप; ३३ हजार लाभार्थी वंचीत
अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील ३ लाख ९७ हजार ३७७ कार्डधारकांपैकी ३ लाख ६३ हजार ६३० कार्डधारकांमधील प्रत्येक व्यक्तीस पाच किलो तांदुळ मोफत देण्यात आला आहे. ९१ टक्के लाभार्थ्यांना ८३२२.५ मे. टन तांदूळ वितरण झालेला आहे. त्यामुळे सध्या ३३ हजार ७४७ लाभार्थी मोफत धान्यापासून वंचीत आहेत.
केशरी शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य नाही
एपीएल शेतकरी (केशरी) योजनेचे व उर्वरित एपीएल (केशरी) एनपीएस योजनेचे लाभार्थी पाच किलो मोफत तांदुळ घेण्यास पात्र नाहीत. त्यामुळे त्यांना मोफत तांदुळ दिल्या जात नाही. इतर लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरळीत सुरू आहे.
- गणेश बेल्लाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.