लिव्हर देऊन थोरल्या भावाला बहिणीने दिले जीवनदान!

By संदीप वानखेडे | Published: November 16, 2023 05:14 PM2023-11-16T17:14:31+5:302023-11-16T17:16:06+5:30

आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज.

Sister gave life to elder brother by giving liver in buldhana | लिव्हर देऊन थोरल्या भावाला बहिणीने दिले जीवनदान!

लिव्हर देऊन थोरल्या भावाला बहिणीने दिले जीवनदान!

सिंदखेडराजा : धकाधकीच्या या व्यवहारी जगात भावना, रक्ताच्या नात्यालादेखील महत्त्व राहिले ना.. व्हर्च्युअल झालेल्या पिढीला तर नात्यातील ओलावा माहीत नाही. शहरातील अपार्टमेंट सांस्कृतिक आपल्या शेजारी कोण राहतो, याची कल्पना नसलेल्या आजच्या युगात ग्रामीण भागात मात्र आजही माणुसकी, नात्यातील ओलावा जिवंत असल्याचे समोर आले आहे. पळसखेड चक्का येथील बहिणीने आपल्या भावाला यकृत दान करून भाऊबिजेची आगळीवेगळी भेट दिली.

अंढेरा येथील रमेश नागरे (वय ४८) हे मूळ शेतीसह हॉटेल व्यवसाय करतात. २०१९ पासून त्यांना पोटाचा विकार सुरू झाला. प्राथमिक स्वरूपात त्यांना देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे दाखविण्यात आले. मूळ कारण लक्षात येत नसल्याने अखेरीस त्यांना स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तपासण्यात आले.

लिव्हरमध्ये अडचण असल्याचे निदान झाल्यानंतर लिव्हरचा काही भाग त्यांना मिळणे आणि त्याचे ट्रान्सप्लांट होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्यांना आवश्यक असलेले लिव्हर घटक कोण देणार यात कुटुंब, नातेवाइकांत चर्चा झाली. लिव्हर देणाऱ्या व्यक्तीचे आणि रमेश नागरे यांचा रक्तगट व अन्य काही सम असणे आवश्यक होते. अनेकांचा रक्तगट तपासण्यात आला त्यात बहीण दुर्गा धायतडक यांचा रक्तगट रमेश यांच्याशी मॅच झाला. दुर्गा या रमेश यांच्या धाकट्या बहीण आहेत. पळसखेड चक्का येथील धायातडक कुटुंबातील आदर्श सून, आपल्या कुटुंब, परिवारावर प्रेम करणारी गृहिणी... या आधुनिक दुर्गाने कोणताही विचार न करता आपल्या थोरल्या भावला जीवनदान देण्याचे ठरविले. डॉक्टरांनी दुर्गा यांच्या सर्व आवश्यक तपासण्या केल्या आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे निश्चित झाले.

दोन दिवसांपूर्वी झाले प्रत्यारोपण- मुंबई येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी हे ट्रान्सप्लांट झाले. भाऊ, बहीण दोघेही सुखरूप आहेत. येत्या काही दिवसांत दुर्गा यांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात येणार आहे तर रमेश यांना दोन महिने पुढील उपचार घ्यावे लागणार आहेत. प्रकाशपर्व मानल्या जाणाऱ्या या दिवाळीसणात बहिणीने आपल्या थोरल्या भावाचे जीवन प्रकाशमान केले. भावा-बहिणीच्या नात्यातील या निस्सीम प्रेमाची चर्चा परिसरात होत आहे.

Web Title: Sister gave life to elder brother by giving liver in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.