मुख्याधिकाऱ्यांकडून खामगाव शहरातील विविध प्रभागाचे स्थळ निरिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:58 AM2020-03-27T11:58:05+5:302020-03-27T11:58:11+5:30
ठराविक वेळेत आणि एक मीटर अंतरावरूनच ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून खामगाव शहरात आता भाजी विक्रीसाठी १०० तर फळ विक्रीसाठी २५ दुकानांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात भाजीची ५ दुकाने राहतील. उर्वरीत २० दुकाने मुख्य रस्त्यावर राहणार आहे. त्यामुळे आता ठराविक वेळेत आणि एक मीटर अंतरावरूनच ग्राहकांना भाजी खरेदी करावी लागणार आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजाराने देशभर कहर माजविला आहे. कोरोनाच्या विषाणूने महाराष्ट्रात संचार वाढविल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून २३ मार्चपासून सर्वच शहरे लॉकडाऊन करण्यात आलीत. यामध्ये खामगाव शहराचाही समावेश असून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आला. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी होत असल्याचे निदर्शनास येतात नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून चुन्याचे रकाने आखण्यात आलेत. ठराविक वेळेत भाजी खरेदीची मुभाही दिली आहे. मात्र, भाजीपाला किराणा आणि औषधी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
प्रामुख्याने भाजीपाल्याच्या दुकानावर झुंबड उडत असल्याचे निर्दशनास येताच, गर्दी नियत्रंणासाठी उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात भाजीची ५ दुकाने सकाळी ७ ते १२ या वेळेत सुरू रहाणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरही ठराविक अंतराने ही दुकाने राहणार आहे.
नगर पालिका प्रशासनाची बैठक!
शहरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून नगर पालिका मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरोग्य, अग्निशमन आणि आपातकालीन विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी विविध विभागप्रमुखासह शहरातील विविध प्रभागांचे स्थळ निरिक्षण केले. त्यानंतर या ठिकाणी दुकानांसाठी चुन्याचे रकाने आखण्यात आले.
भाजी दुकानांवर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रभागनिहाय दुकानांसाठी स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात भाजीची १०० तर फळांसाठी २५ दुकाने राहतील. आपातकालीन परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे.
- धनंजय बोरीकर
मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.