बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस
By निलेश जोशी | Published: March 4, 2023 09:47 PM2023-03-04T21:47:42+5:302023-03-04T21:49:36+5:30
सदर पेपर हा बिबी (ता. लोणार) येथून दोन शिक्षकांनी मोबाइलवर लोड करून इतर नातेवाइकांना पाठविला गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर तो व्हायरल झाल्याची चर्चा आहे.
साखरखेर्डा (जि. बुलढाणा) : पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी सहाजणांना ४ मार्च रोजी सायंकाळ दरम्यान चौकशीनंतर ताब्यात घेतले असून, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस लोणार तालुक्यातील बिबी येथे गेले आहेत. बारावीची परीक्षा सुरू असताना गणित विषयाचा पेपर मोबाइलवर बुलढाणा जिल्ह्यात ३ मार्च रोजी व्हायरल झाला होता. नागरे नामक व्यक्तीने सरळ तो पेपर एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीकडे पाठविला.
सदर पेपर हा बिबी (ता. लोणार) येथून दोन शिक्षकांनी मोबाइलवर लोड करून इतर नातेवाइकांना पाठविला गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर तो व्हायरल झाल्याची चर्चा आहे. मेहकरचे पोलिस उपविभागीय अधिकारी यामावार आणि साखरखेर्ड्याचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी चक्रे गतिमान करीत शेंदुर्जन येथील एका संस्थाचालकाला आणि राजेगाव, कंडारी, भंडारी येथील व्यक्तींना पेपर व्हायरल केल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या व्यक्तींना पेपर सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर पेपर पाठविणाऱ्यांचे रॅकेट बिबी असून, तेथील दोन शिक्षकांचे मोबाइल लोकेशन तपासून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.