बुलडाणा जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:06 PM2020-08-29T13:06:00+5:302020-08-29T13:06:10+5:30
तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने दोन मोठे आणि सहा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. खकडपूर्णा प्रकल्पात ८४.३४ टक्के जलसाठा असून पेनटाकळी प्रकल्पाचा जलसाठा ७८.७७ टक्यांवर पोहचला आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावळी १०० टक्यांवर पोहचले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच मन प्रकल्पाचा जलसाठा ९२.६१ टक्यावर पोहचला आहे. पाऊस सुरूच असल्याने जलसाठ्यात वाढ होत आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. २९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, तोरणा आणि उतावणी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे २० से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात १९.४६ घनमिटर प्रती सेकंट इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच वक्रद्वारे ३० से.मी न उघडण्यात आली आहेत.
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील दोन मोठ्या आणि सहा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहेत. त्यामुळे, नद्या दुथळी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाउस सुरू असल्याने जलपातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७.२ मिमी सरासरी पाउस झाला आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.