मजुराच्या मृत्यूप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा
By admin | Published: October 30, 2014 11:37 PM2014-10-30T23:37:43+5:302014-10-30T23:37:43+5:30
खामगाव येथील न्यायालयाचा निकाल.
खामगाव (बुलडाणा) : घरातील विहिरीत मेलेले कासव काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या मजुराच्या मृत्यूप्रकरणी घरमालकास सहा महिन्यांची शिक्षा देण्यात आली. हा निकाल आज गुरूवारी खामगाव न्यायालयाने दिला. तालुक्यातील वाडी येथील नंद ऊर्फ मेघराज भागदेवाणी यांच्या घरातील विहिरीत कासव मेलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगलेले होते. यावेळी त्यांच्याकडे मजूर म्हणून वाडी येथील संतोष भोपळे हा काम करीत होता. ११ डिसेंबर २00८ रोजी संतोष हा भागदेवाणी यांच्या सांगण्यावरून विहिरीत मेलेले कासव काढण्यासाठी उतरला असता त्याचा विहिरी तच मृत्यू झाला. या घटनेची तक्रार रामकृष्ण खुशाल भोपळे यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नंद ऊर्फ मेघराज भागदेवानी यांच्याविरुद्ध गुन्हा ३१२/0८ तद्नंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणाचा आज खामगाव येथील क्र.१ चे न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम. नेरलीकर यांनी निकाल दिला. यामध्ये आरोपी नंद ऊर्फ मेघराज भागदेवानी यास सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दोन हजार रुपये दंड देण्यात आला. दंड न भरल्यास पाच दिवसाची अतिरिक्त शिक्षा असा निकाल देण्यात आला. याप्रकरणी सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने अँड.कु.एस.व्ही. इंगळे यांनी काम पाहिले.