२४० कलावंतांना सहा महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 04:01 PM2020-01-17T16:01:27+5:302020-01-17T16:01:40+5:30
गत चार वर्षांमधील निवड झालेल्या एकूण २४० कलावंतांचे मानधन गत सहा महिन्यांपासून अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात सहा महिन्यांपुर्वी नव्याने निवड झालेल्या २४० कलावंताना अद्यापही मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.
शासनाच्या वृध्द साहित्यिक कलाकार मानधन योजनेअंतर्गत गत चार वर्षांमधील निवड झालेल्या एकूण २४० कलावंतांचे मानधन गत सहा महिन्यांपासून अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे मानधान तत्काळ जमा करून वृध्द कलावंतांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील वृध्द साहित्यिक कलावंतांना शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत तुटपुंजे मानधन देण्यात येत आहे, असा आरोपही वृध्द कलावंत करीत आहेत. गत सन २०१५ -१६ ते २०१८-१९ या चार वर्षांतील प्रत्येकी ६० अशा एकूण २४० पात्र कलावंतांची निवड सहा महिन्यांपूर्वी निवड समितीच्या माध्यमातून करण्यात आली. त्यात अ वर्ग कलावंत १४, ब वर्ग कलावंतर ६० व क वर्ग कलावंत १६६ अशा २४० कलावंतांची निवड करण्यात आली आहे. परंतु जिल्ह्यातील २४० पात्र कलावंतांची निवड होऊन सहा महिने उलटून गेले, तरीही अद्यापपर्यंत कलावंतांना त्यांचे मानधन मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरातील कलावंतांची फरपट सध्या हाते आहे.
(प्रतिनिधी)