बुलडाणा तालुक्यात सहा पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:42+5:302021-07-04T04:23:42+5:30
स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर बुलडाणा : शहरातील अनेक वॉर्डांत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाल्या तुंबल्या असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ...
स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
बुलडाणा : शहरातील अनेक वॉर्डांत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाल्या तुंबल्या असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. दुर्गंधी पसरली असून, आरोग्यास धोका निर्माण होत आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन नाल्यांची वेळोवळी सफाई करण्याची मागणी होत आहे.
पावसाळ्यातही पाणीपुरवठा प्रभावित
बुलडाणा : शहरालगत असलेल्या गावांचा पाणीपुरवठा पावसाळ्यातही प्रभावित होत आहे. सागवन, सुंदरखेड, माळविहीर गावे शहराला लागून आहेत. त्यामुळे या गावांची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, येथे पाणीपुरवठा लांबणीवर गेला आहे.
शेतात साचले पाणी
हिवरा आश्रम : गजरखेड शिवारात आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून, पिकांना धोका निर्माण झाला आहे. काही भागात हा पाऊस पिकांसाठी जीवनदान ठरला आहे.
वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान
डोणगाव : सध्या सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पिकेसुद्धा चांगली आहेत. मात्र, या पिकांना वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे. हरणाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. घाटबोरी परिसरातही वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.
उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्याला धोका
जानेफळ : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. चौका-चौकांतील हॉटेलमध्ये करण्यात आलेले पदार्थ उघड्यावर ठेवले जातात. त्यावर माश्या बसून तेच पदार्थ विक्री केले जात असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बसस्थानकात मोकाट जनावरांचा वावर
मेहकर : येथील स्थानकामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. बसस्थानकात ही जनावरे ठिय्या मांडून बसत आहेत. सध्या बसस्थानकाचे काम सुरू असल्याने बाजूलाच तात्पुरते बसस्थानक थाटण्यात आलेले आहे. परंतु, पावसाळ्यात प्रवाशांना याठिकाणी त्रास सोसावा लागतो.