नांदुरा रोडवरील लूटमारप्रकरणी आरोपीचे स्केच जारी, तक्रारकर्त्यांच्या वर्णनावरून तयार केले स्केच
By अनिल गवई | Published: July 26, 2023 05:45 PM2023-07-26T17:45:20+5:302023-07-26T17:45:52+5:30
स्थानिक चित्रकला महाविद्यालयातील एका शिक्षकाने तक्रारकर्त्यांच्या वर्णनावरून स्केच तयार केले.
खामगाव : दुचाकीवर बसण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका शेतकऱ्याच्या हातून पावणेपाच लाखांची रक्कम हिसकावून पळणाऱ्या एका आरोपीचे स्केच शहर पोलिसांनी जारी केले आहे. स्थानिक चित्रकला महाविद्यालयातील एका शिक्षकाने तक्रारकर्त्यांच्या वर्णनावरून स्केच तयार केले.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील दिलीप सदाशिव हटकर (वय ५५) या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:सह दोन मुलांच्या खात्यातून पीक कर्जाची चार लक्ष ७३ हजार रुपयांची रक्कम काढली.
खामगाव शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेतून रक्कम काढल्यानंतर तीन हजार रुपये स्वत:कडे ठेवले. उर्वरित चार लक्ष ७० हजार रुपये थैलीत ठेवून मुलासह ते बँकेच्या बाहेर पडले. मुलाच्या गाडीवर बसण्याच्या प्रयत्नात असतानाच, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हाताला हिसका देत रक्कम पळवली. या प्रकरणी हटकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, चौकशीचा भाग म्हणून शहर पोलिसांनी मंगळवारी तक्रारकर्ते हटकर यांना पाचारण केले. त्यांनी केलेल्या वर्णनावरून एका आरोपीचे स्केच जारी करण्यात आले.
तीन स्केच केली तयार
खामगाव येथील एका चित्रकला महाविद्यालयातील चित्रकला शिक्षकाने तक्रारकर्ते दिलीप हटकर यांनी केलेल्या वर्णनावरून पैसे हिसकावणाऱ्या आरोपीची तीन स्केच तयार केली. या तीनपैकी एक स्केच आरोपीच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते असल्याची तक्रारकर्त्यांची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी शेवटचे अर्थातच तिसरे स्केच जारी केले.