लॉकडाउनमध्ये विटभट्ट्यांचा धूर झाला गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:20 PM2020-06-02T12:20:29+5:302020-06-02T12:20:40+5:30
विटभटट्यांचा धूर काही दिवसांपासून गायब झाल्याने अनेक कच्चा विटांचा माल भट्टीवर पडून आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात अकोला, जळगाव खांदेशमधून विटांचा पुरवठा होतो. लॉकडाउनमुळे कामगार स्वगृही परतल्याने सध्या अनेक भट्ट्यांचे काम बंद आहे. विटभटट्यांचा धूर काही दिवसांपासून गायब झाल्याने अनेक कच्चा विटांचा माल भट्टीवर पडून आहे.
बांधकाम क्षेत्राची वाढती मागणी पाहता सर्वत्र वीटभट्टी उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले. विटभट्टीच्या कामासाठी कामगार सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश वीटभट्ट्यांवर स्थलांतरित कामगार राबतात. वीटभट्टी कामगारांना हजार विटांमागे ३०० ते ५०० रुपये दिले जातात. एक हजार विटा काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. वीटभट्टी कामगार बहुतांश परजिल्ह्यातून व परराज्यातून येतात. ८ महिने ते झोपडीमध्ये राहतात. विटांचे कारखाने हे गावाजवळ कमी आणि जंगल परिसरामध्येच अधिक आहेत. जंगलातील लाकडाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो. मात्र वनविभागाने अटकाव केल्याने लाकूड उपलब्ध होऊ शकत नाही.
विटभट्टीसाठी दगडी कोळशाचा वापर केल्या जातो. कोळसा यवतमाळ जिल्हया्तील वणी येथून येतो. लॉकडाउनमुळे वाहतूक बंद असल्याने कोळसा पुरवठा होऊ शकला नाही. औष्णिक विद्यूत प्रकल्पातून निघणारी राख वीटभट्टी उद्योगांना मोफतमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे वीटभट्टी हा नफ्याचा धंदा म्हणून करण्याला प्राधान्य दिले जाते. जिल्ह्यात अकोला, जळगाव खांदेशमधून विटा येतात. बाळापूर, मुक्ताईनगर येथील विटांचा दर्जा चांगला असल्याने तेथील विटांना जास्त मागणी आहे. मात्र लॉकडाउनमुळे विटांचा पुरवठा होऊ शकला नाही. कामगारही स्वगृही परतल्याने कच्च्या विटांचा माल भट्टीवर पडून आहे.