शेतक-यांना एसएमएसचा फायदा
By Admin | Published: January 28, 2016 12:15 AM2016-01-28T00:15:37+5:302016-01-28T00:59:02+5:30
१ लाख ७0 हजार शेतक-यांची झाली योजनेअंतर्गत नोंदणी.
खामगाव : हवामानातील बदलामुळे कृषी क्षेत्रात सध्या काहीसी चिंता व उत्पादनात अनियमितता आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना हवामान बदल तथा पीकांवर येणार्या कीडीच्या प्रादुर्भावाबाबत अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने जून २0१५ पासून किसान एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या कक्षेत जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्री आता आले आहेत. परिणामी शेतकर्यांना पीक पाण्याविषयी सविस्तर व अचूक माहिती थेट पोहोचत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातही आता अधुनिकीकरणाने प्रवेश केला आहे. गेल्या दोन वर्षापासून हवामानातील बदलामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अभूतपूर्व गारपीट, अवकाळी पाऊस अवर्षण असे चक्र गेल्या काही वर्षापासून सुरू झाल्याने शेतीक्षेत्र प्रभावीत झाले आहे. त्यातच योग्य वेळी शेतकर्यांना मार्गदर्शन उपलब्ध होत नसल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला खास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावल्या जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना हवामान बदलाची अचूक माहिती तथा पीकांवर येणार्या किडीचे योग्य वेळी व्यवस्थापन केले जावे यासाठी थेट शेतकर्यांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यास पाच लाख ४८ हजारांच्या आसपास शेतकरी असून त्यापैकी एक लाख ७0 हजार ८६२ शेतकर्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची या उपक्रमातंर्गत आतापर्यंत कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील एकूण शेतकर्यांशी तुलना करता जवळपास ३१ टक्के शेतकरी यामध्ये समाविष्ट झाले आहे. त्यांना आता कृषी विषयक सल्ला थेट एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहे.