आरटीई प्रक्रियेत 'एसएमएस'च्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:17 PM2020-02-21T13:17:44+5:302020-02-21T13:17:49+5:30
तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम विदर्भात १० हजार ३२० जागा: आठ दिवसात १५ हजारावर अर्ज
बुलडाणा: पश्चिम विदर्भातून आरटीई अंतर्गत १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अमरावती विभागातून गेल्या आठ दिवसातच १५ हजार ७६४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. सध्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे.
दुर्बल व वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. अमरावती विभागामध्ये ९७६ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यातून एकूण १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिल्या जाणार आहे. त्यासाठी आॅनलाइन प्रवेश अर्जप्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत राबविली जात आहे. परंतू सुरूवातीपासून या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा सामनाकरावा लागत आह. पाल्याचा अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावरून भरताना नावे पूर्ण भरली जात नव्हती. अर्ज भरल्यानंतर पालकांना आपल्या अर्जाची माहिती व अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आदी बाबींची एसएमएसद्वारे पालकांच्या मोबाईलवर पाइविल्या जातात. परंतू आता तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एसएमएस जात नाहीत. त्यामुळे नविन नोंदणी केल्यावर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहेत.
अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज
आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. अमरावती जिल्ह्यातून ४ हजार ७६२ अर्ज आले आहेत. तापाठोपाठ अकोला जिल्ह्याचा जिल्ह्याचा नंबर लागतो. अकोला जिल्ह्यातन ३ हजार ९०५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३ हजार १२०, वाशिम जिल्ह्यात ८८४ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ९३ अर्ज आले आहेत.