धावत्या ऑटोरिक्षात निघाला साप; ऑटोरिक्षा उलटून मजूर ठार, चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 PM2021-09-02T17:30:24+5:302021-09-02T17:30:51+5:30
Accident News : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन एक मजूर ठार झाला तर चौघे जण जखमी झाले.
बुलडाणा: धावत्या ॲपेमध्ये एका बांधकाम मजुराच्या पिशवीतून अचानक साप बाहेर आल्याने गोंधळ निर्माण होऊन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात होऊन एक मजूर ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. हा अपघातबुलडाणा-देऊळघाट मार्गावर १ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला.
देऊळघाट येथील काही मजूर हे बुलडाणा येथील बांधकामावर कामासाठी आले होते. दिवसभराचे काम आटोपून रात्री ते देऊळघाट येथे ॲपेद्वारे जात होते. दरम्यान बुलडाणा-देऊळघाट मार्गावरील दामू मिस्त्री याच्या शेताजावळ ॲपेला धावत असताना मोठा दणका बसला. त्या दणक्यादरम्यान एका मजुराच्या पिशवीमधून साप अचानक बाहेर आला. त्यामुळे ॲपेमधील बांधकाम मजूर घाबरले. या गोंधळात वाहन चालकाचेही वाहनावरील नियंत्रण सुटून ॲपे उलटून अपघात झाला. त्यात प्रल्हाद रामजी हिवाळे (५४, रा. देऊळघाट) हा बांधकाम मजूर जागीच ठार झाला. तर ॲपेमधील सुपडा कौतिकराव हिवाळे, गणेश शिवलाल बिबे, मनोज सुखदेव जाधव आणि ॲपे चालक रशीद मिर्झा (सर्व रा. देऊळघाट) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. देऊळघाट येथील बांधकाम मजूर १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे कामासाठी बुलडाणा शहरात आले होते. सायंकाळी काम संपल्याने सर्वजण एका प्रवासी ॲपेमध्ये बसून देऊळघाटकडे जात होते. हे मजूर दररोज त्यांच्यासोबतच जेवणाचे डबे आणतात. अशाच एका मजुराचा जेवणाचा डबा ठेवलेल्या पिशवितून अचानक साप बाहेर आला. त्या पिशवीत साप असल्याची कल्पनाही मजुरांना नव्हती. अनपेक्षीत घडलेल्या या प्रकारामुळे ॲपेमधील पाचही मजूर व ॲपे चालक घाबरेल व गोंधळून गेले. त्यातच ॲपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटू हा अपघात झाला. या अपघात प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी ॲपेचालक रशीद मिर्झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
--पिशवीत साप आला कोठून?--
धावत्या ॲपेमध्ये बसलेल्या मजुरांपैकी एका मजुराच्या पिशवीत साप नेमका कोठून आला ही बाब गुलदस्त्यात आहे. प्रसंगी ज्या ठिकाणी ते काम करत होते. त्याच परिसरातून एखाद्या पिशवीत हा साप गेला असावा. त्याची मजुरांनाही कल्पना नव्हती. व जेव्हा धावत्या ॲटोला रस्त्यावरील खड्ड्यामुळे दणका बसला तेव्हा हा साप पिशवीतून बाहेर आला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे.