मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये आतापर्यंत फक्त तीन महिलांनाच मिळाली उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 03:43 PM2019-10-04T15:43:40+5:302019-10-04T15:46:05+5:30
पहिल्याच वेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने सविता मुंढे यांच्यावर विश्वास टाकला आहे.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ तीनच महिलांना प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली आहे. पहिल्यांदा काँग्रेसने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदा कायंदे यांना १९९९ ला संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये चिखलीच्या माजी आमदार रेखताईा खेडेकर यांना रिंगणात उतरवले. तर २०१९ मध्ये पहिल्याच वेळी विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीने सविता मुंढे यांच्यावर विश्वास टाकला आहे.
सिंदखेड राजा हे माँ जिजाऊ यांचे माहेर आहे. असे असले तरी मतदारसंघातून उमेदवारी देतांना प्रमुख राजकिय पक्षांनी महिलांकडे दुर्लक्ष केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिलेली नाही. सिंदखेडराजा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नंदा कायंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले उमेदवार म्हणून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे रिंगणात होते. शिवसेनेकडून छगन मेहेत्रे यांना संधी देण्यात आली होती. या निवडणूकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ५८ हजार मते घेत विजय संपादन केला. काँग्रेसच्या नंदा कायंदे यांना ४२ हजार मते मिळाली मिळाली होती.
१९९९ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर डॉ. शिंगणे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. १९९५ मध्येही ते येथून अपक्ष म्हणून छत्रीच्या चिन्हावर निवडून आले होते.
दरम्यान, २०१४ मध्ये शिंगणे यांनी निवडणूक लढविली नाही. त्यामुळे पक्षाने महिला उमेदवाराच्या रुपात चिखलीच्या माजी आमदार रेखाताई खेडेकर यांना संधी दिली. परंतू राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात रेखाताई खेडेकर यांना ३७ हजार १६१ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ६४ हजार २०३ मते घेत पहिल्यांदा आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सविता मुंढे यांना संधी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीनेच महिला उमेदवारास संधी दिली आहे. माँ जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघातून आतापर्यंत एकही महिला विजयी झाली नसली तरी महिलांना संधी मिळणे गरजेचे आहे. संधी मिळाल्याशिवाय महिला स्वत: ला सिध्द करु शकणार नाहीत.