जळगाव-बऱ्हाणपूर रस्त्याचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 11:40 AM2021-04-04T11:40:47+5:302021-04-04T11:41:30+5:30
Jalgaon-Barhanpur road : सातपुडा पर्वतातील काम पूर्ण होणे आणि नांदुरा-जळगाव मार्गावरील मध्य रेल्वेच्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.
- नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : आडवळणावर असलेल्या जळगाव शहराला व तालुक्याला आंतरराज्य महामार्गावर आणण्यासाठी जळगाव-बऱ्हाणपूर रस्त्याचे सातपुडा पर्वतातील काम पूर्ण होणे आणि नांदुरा-जळगाव मार्गावरील मध्य रेल्वेच्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे हे प्रश्न अद्यापही पूर्णत्वाला गेले नाहीत. त्यामुळे आडवळणाच्या जळगाव नगराचे भाग्य केव्हा उजळणार, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील काही रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु काही वर्षांपूर्वी नांदुरा रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलासह नांदुरा नगरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी केले होते. परंतु नंतर तो प्रश्न प्रलंबितच राहिला. जळगावकडे येतांना रेल्वे गेटची मोठी अडचण वाहनधारकांना सहन करावी लागते. चोवीस तासांपैकी किमान १६ ते १७ तास हे रेल्वे गेट बंद असते, अशा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे. हे काम नितीन गडकरी यांनी लक्ष दिले तरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. जळगाव-बऱ्हाणपूर आंतरराज्य महामार्गाचा प्रश्नसुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत प्रलंबित आहेत. जळगाव-बऱ्हाणपूर हे अंतर ५९ किलोमीटरचे आहे. पैकी ते ४३ किलोमीटर रस्त्याचा भाग हा मध्यप्रदेश हद्दीत येतो. मध्यप्रदेश सरकारने ४३ किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरण करून डांबरीकरण केले आहे. सातपुडा पर्वतात येणाऱ्या मार्गाचेही दुपदरीकरण केले आहे. त्यामुळे आता या रस्त्यावर नियमित वाहतूक होण्यासाठी सातपुडा पर्वतातील सुमारे सहा किलोमीटर अंतराची अडचण आहे.
जळगाव ते बऱ्हाणपूर या ५९ किलोमीटरपैकी सद्यस्थितीतील ५३ किमीच्या रस्त्याचे काम झाले आहे. अवघ्या सहा किमीच्या अपूर्ण रस्त्यामुळे या मार्गावरील अधिकृत वाहतूक सुरू झाली नाही. बांधकाम विभागाने हा प्रश्न त्वरित सोडविण्याची गरज आहे.
४० किमीचे अंतर होणार कमी
जळगाव-बऱ्हाणपूर आंतरराज्य मार्ग सुरू झाल्यास बऱ्हाणपूर, खंडवा, इंदोर, उज्जैनकडे जाण्याचे अंतर सुमारे ४० किमीने कमी होणार आहे. सध्या नागपूर, अमरावती, अकोला, अकोट, शेगाववरून वाहने मलकापूर, मुक्ताईनगर मार्गे बऱ्हाणपूरला जातात. त्यामुळे सध्या आडवळणावर असणारे जळगाव शहर आंतरराज्य महामार्गावर येणार आहे.
शेगावचे अंतर होणार कमी
मध्यप्रदेशात श्री संत गजानन महाराजांचा मोठा भाविक वर्ग आहे. खंडव्यावरून बऱ्हाणपूर, जळगाव, जामोद मार्गे अनेक भक्त शेगावची पायीवारीसुद्धा करतात. हा रस्ता सुरू झाल्यास गजानन भक्तांची कमी अंतराने शेगाव येथे येण्याची सोय होईल. त्यामुळे हा रस्ता त्वरित सुरू होणे महत्त्वाचे आहे.