लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा मातीचा थर आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 06:32 AM2019-11-28T06:32:48+5:302019-11-28T06:33:04+5:30
जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे.
बुलडाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे. सांडव्यातून वाहून जाणाऱ्या पाणयामुळे या थराची झिज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे एक प्रतिबंधक भिंत बांधून त्याचे जतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
अश्नीचा इम्पॅक्ट झाल्यानंतर उठलेला मलबा अर्थात इजेक्टा ब्लँकेट नेमक्या कोणत्या भागात आहे. त्याची लांबी, रुंदी व अनुषंगीक माहिती संकलीत करण्याचे निर्देशही नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत. त्यानुषंगाने तज्ज्ञ समितीचे सदस्य असलेले कर्नाटक विद्यापीठाचे जिओलॉजिकल विभागाचे प्रा. लिंगदेवरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी लोणार सरोवर येथे भेट दिली.
लिंगदेवरून यांनी सरोवरालगत असलेल्या किन्ही डॅम्पच्या सांडव्याच्या परिरात पाहणी करून तेथे सरोवर निर्मिती पूर्वीच्या लाखो वर्षापूर्वीचा मातीचा थर जतन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता या किन्ही डॅबच्या सांडव्यालगत लाखो वर्षापूर्वीच्या या मातीच्या थराच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत बाधण्यात येणार आहे.
पेलेसोल लेअर महत्त्वाचा
सुमारे ५० लाख वर्षापूर्वी लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे. मात्र, ही निर्मिती होण्यापूर्वी तेथे असलेल्या मातीचे नमुनेही किन्ही डॅम्पच्या सांडव्या लगत सापडलेले आहेत. त्यामुळे सरोवर निर्मितीनंतर परिसरात झालेले बदल आणि लाखो वर्षापूर्वीच्या या मातीच्या थराचा (पेलेसोल लेअर) तुलनात्मक अभ्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे त्याचे जतन होणे गरजेचे असल्याचे मत लिंगदेवरू यांनी यावेळी अधिकाºयांशी चर्चा करताना व्यक्त केले.
एकात्मिक विकास व्यवस्थापन आराखडा बनविणार
लोणार सरोवर एकात्मिक विकास व्यवस्थापन आराखडा बनविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून त्याची जबाबदारी भोपाळ येथील स्कूल आॅफ मॅनेटमेंट अॅन्ड आॅर्कियालॉजिकला सोपविण्यात आहे. त्यासंदर्भाने भोपाळ येथील या स्कूलच्या सहाय्यक प्राध्यापक विशाखा कव्हेटकर व त्यांचे सहकारी रमेश भोळे यांनी सरोवराची पाहणी करुन संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली.