मासरूळ येथील सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:25+5:302021-06-06T04:26:25+5:30
मासरूळ येथील सैनिक नारायण लक्ष्मण आल्हाट हे भारतीय सैन्यदलाच्या जनरल रिझर्व इंजिनीअरिंग फोर्समध्ये सध्या जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये कार्यरत होते. ...
मासरूळ येथील सैनिक नारायण लक्ष्मण आल्हाट हे भारतीय सैन्यदलाच्या जनरल रिझर्व इंजिनीअरिंग फोर्समध्ये सध्या जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये कार्यरत होते. ते २९ ऑगस्ट, १९९५ ला भरती झाले होते. दरम्यान, १२ एप्रिल, २०२१ रोजी ते आपल्या मूळ गावी मासरूळ येथे सुट्टीवर आले होते. ४ जून रोजी अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली. त्यानंतर, त्यांना बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. नारायण आल्हाट यांच्यावर मासरूळ येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार अमरसिंग पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे अध्यक्ष रामराव गायकवाड, विष्णू महाराज सास्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. वीर जवान अमर रहेच्या घोषणेने ग्रामस्थांनी नारायण आल्हाट यांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा मोठा आप्तपरिवार आहे.