शिक्षकांच्या समस्या सोडवा!
By admin | Published: July 17, 2017 02:05 AM2017-07-17T02:05:46+5:302017-07-17T02:05:46+5:30
गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शिक्षण हा राज्याच्या व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण पद्धतीवर देशाचे अथवा राज्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबून असते. या पद्धतीचा शिक्षक हा कणा आहे. त्यामुळे कणा मजबूत असणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना ज्ञानदानाचे कार्य करणे सहज करावे, असे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांच्या समस्या सोडविताना राज्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, शिक्षण उपसंचालक राठोड, माजी आमदार धृपतराव सावळे, सभापती श्वेता महाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख, शिवचंद्र तायडे आदी उपस्थित होते.
शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याच्या सूचना करीत राज्यमंत्री पाटील म्हणाले, पगारासाठी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागू नये. तसेच एमसीव्हीसी कनिष्ठ, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी. या वेतनश्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना त्वरित वेतनश्रेणी द्यावी. त्याचप्रमाणे शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विहित कालावधीत अदा करावे. या देयकांसाठी विहित कालावधीत अंमलबजावणी कार्यक्रम ठरवावा.
याप्रसंगी शिक्षकांनी विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये चटोपाध्याय प्रलंबित प्रकरणे, अंशदायी निवृत्तीवेतन योजना बंद करून जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे, अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत कपात झालेल्या निधीबाबत पावत्या देणे आदी प्रश्नांचा समावेश होता.
सर्व प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन देत काही प्रश्न जागेवरच ना. पाटील यांनी सोडविले. या सभेचे संचालन अंजली नेटके यांनी केले. सभेला उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या विचार सभेला जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काही शिक्षकांनी निवेदने देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.