काही भाग तहानलेलाच!

By admin | Published: September 3, 2014 11:37 PM2014-09-03T23:37:28+5:302014-09-03T23:39:10+5:30

खामगावातील विस्कळीत पाणीपुरवठा आंशिक सुरळीत; मात्र, अद्याप शहरातील बहुतांश भाग तहानलेलाच

Some parts thirsty! | काही भाग तहानलेलाच!

काही भाग तहानलेलाच!

Next

खामगाव : गेल्या चौदा-पंधरा दिवसांपासून विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासनाला अखेर आज यश आले. मात्र, अद्यापही शहरातील बहुतांश भाग तहानलेलाच आहे. त्यामुळे ऐन गौरी-गणपतीत शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गौरी- गणपतीची घरगुती स्थापना करणार्‍या नागरिकांसह काही गणेश मंडळांना महाप्रसादासाठी पाणी विकत घेण्याची वस्तुस्थिती शहराच्या अनेक भागात अद्यापही कायम आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलवाहिनीचा काही भाग पुरात वाहून गेला. त्यामुळे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीपेक्षा शहरातील सर्वच भागात पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरासह फरशी, शिवाजी नगर, दाळ फैल, सिव्हील लाईन, शंकर नगर, चांदमारी, वामन नगर, हरिफैल या भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले. गौरी-गणपती सारख्या महत्वपूर्ण सणासुदीच्या काळात अनेक भागातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्यामुळे गणेश मंडळांसह नागरिकांना चांगलेच हतबल व्हावे लागले.
दरम्यान, आज बुधवारी फरशी, भोईपुरा, जैन मंदिर परिसरात पाणी पुरवठा सुरळीत झाला. मात्र, संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शंकर नगर, सिव्हील लाईन, चांदमारी, वामन नगर, हरिफैल, सर्मथ कॉलनी, गजानन कॉलनी, यशोधाम कॉलनी, एस.टी.डेपो मागील परिसरासह काही भागातील पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
युद्धपातळीवर दुरुस्ती
अतिदुर्गम भागात वाहून गेलेली पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाला चांगलेच प्रयत्न करावे लागले. पाऊस बंद झाल्यानंतर लागोपाठ २७ तास परिश्रम करून पालिका प्रशासनाने पाईपलाईनची दुरूस्ती केली. त्यामुळे आज पहाटे वामन नगर आणि घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीत पाणी पोहोचले. त्यानंतर टाईमटेबलनुसार विस्कळीत झालेल्या भागात पाणी पुरवठय़ासाठी आज प्राधान्य देण्यात आले.

युध्द पातळीवर प्रयत्न करून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. काही भागात पाणी पोहोचले नाही, ही वस्तुस्थिती आहे. लवकरच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- अशोकसिंह सानंदा
नगराध्यक्ष, खामगाव.

सणासुदीच्या काळात नागरिकांना पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ही दुर्देवी बाब आहे. तात्काळ पर्यायी व्यवस्था करायला हवी होती.
-गणेश माने
माजी नगराध्यक्ष

अतिशय प्रतिकुल परिस्थितीत मुख्य पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली. २७ तास लागोपाठ काम करून पाईपलाईनची दुरूस्ती केली. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- संजय मोकासरे
उप अभियंता, न.प. खामगाव

Web Title: Some parts thirsty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.