गर्दीतील मनातील हाक राहुल बोंद्रेंपर्यंत पोहचताच चिमुकलीचे नशिब खुलले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:42+5:302021-01-25T04:35:42+5:30
हा सोहळा महिला व बाल कल्याण विकास मंत्री ना.यशोमती ठाकूर, अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे ...
हा सोहळा महिला व बाल कल्याण विकास मंत्री ना.यशोमती ठाकूर, अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते तर माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी पार पडला. या सोहळ्यास महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेतेमंडळींची उपस्थिती होती. तथापि हा सोहळा एकप्रकारे राजकीय शक्तीप्रदर्शनाचा होता. विविध ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सदस्य, त्यांचे समर्थक, महाविकास आघाडीतील कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती या सोहळ्याला होती. एवढ्या मोठ्या गर्दीत एक वयोवृध्द आजी आपल्या अवघ्या आठ वर्षीय नातीसह आपली व्यथा घेवून आलेली असेल, याची साधी कल्पनाही कोणाला नसताना चमत्कार घडावा आणि त्या आजीची समस्या चुटकीसरशी सुटावी, अशी घटना या सोहळ्यात घडली. तालुक्यातील गोद्री येथील आठ वर्षाच्या कु. कार्तिकी महाले या मुलीचे मातृ-पितृ छत्र हरविल्याने तिची वयस्कर आजी तिचा सांभाळ करते. आजीचीही अवस्था दयनीय. मुलाच्या रूपाने म्हातारपणाचा आधार तीने स्वत:ही गमावलेला असताना चिमुकलीचा सांभाळ करण्यात ती हतबल ठरते, या वयातही कसेबसे लहान मुलीचा सांभाळ तीने चालविला आहे. मात्र, आपल्या पश्चात मुलीचे काय होईल? या कल्पनेने खीन्न होते. यानुषंगाने काही मदत मिळेल का, म्हणून ती कार्तिकीला घेवून चिखलीला आली होती. इथे आल्यानंतर राहुल बोंद्रे कार्यक्रमात असल्याचे समजले, सोबत मंत्री देखील चिखलीत आलेले आहेत, त्यांना आपली समस्या सांगू या भावनेने त्या आजीबाईंनी कार्यक्रमस्थळ गाठले. मात्र, कार्यक्रमस्थळाची गर्दी पाहून ती खिन्न झाली. साश्रृनयाने तिने काढता पाय घेतला. मात्र, ही बाब राहुल बोंद्रेंपासून सुटली नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना आजीबाईंकडे पाठविले. तेव्हा हिमंत करून या आजीने स्टेजजवळ येत सर्व परिस्थिती कथन केली. याबाबत ना.यशोमती ठाकूर यांनी राहुल बोंद्रेंना या आनाथ मुलीसाठी काहीतरी करण्याचे सुचविले. क्षणाचाही विलंब न करता राहुल बोंद्रेंनी कु.कार्तिकीला हिरकणी महिला अर्बन बँक राबवित असलेल्या अनाथ पालक योजने अंतर्गत दत्तक घेतले. सोबतच शिक्षण व उदरनिर्वाहासाठी प्रतिमाहा ठराविक रक्कम देण्याचीही घोषणा त्यांनी केली. राहुल बोंद्रेंच्या या कृतीने आठ वर्षिय चिमुकलीला ऐन बालिका दिनाच्या पूर्वदिवशी पालकत्वाची छाया मिळाली असल्याने खऱ्या अर्थाने यंदाचा बालिका दिन सार्थकी लागला.
मनुष्यातील ईश्वराची सेवा करा.. ही आमचे वडिल तात्यासाहेबांची शिकवण. आमच्या वडिलांच्या शिकवणीनुसार अनुराधा परिवाराच्या सेवा यज्ञात कालच्या या कार्याने एक पुण्य समिधा अर्पण केली..!
राहुल बोंद्रे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस.