वीज चमकताच झाडाचा आश्रय बेतू शकतो जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:26+5:302021-06-04T04:26:26+5:30
वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही; परंतु काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित असतात. ...
वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही; परंतु काही स्थान इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित असतात. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वत:साठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात व स्थानिक आपत्कालीन सेवांचे संपर्क तपशिल तयार करावे. जर गडगडाटी वादळाचा, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळ वाऱ्याचा अंदाज असेल तर घराबाहेर जाणे टाळावे. गडगडाट, वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करणे धोक्याचे आहे. घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळाद्वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागाशी संपर्क टाळणे आवश्यक आहे. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या वायरपासून लांब राहणे आवश्यक आहे.
काय करावे...
विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलीत यंत्रे बंद ठेवण्यात यावे. आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा फांद्या तोडून टाकणे. विजा चमकत असताना व घराबाहेर असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवावा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे.
काय करू नये...
गडगडाटासह वादळ आल्यास उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टाॅवर्स, दिव्याचे खांब, धातुचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी टाळावे. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाइल व इतर इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रीकल उपकरणे विद्युत जोडणीस हात लावू नये.
चेतावणीचे चिन्ह...
अतिवेगाने वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना, ही सर्व चेतावणीचे चिन्ह आहेत.