निर्बंध कडक होताच सर्वत्र शुकशुकाट - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:26+5:302021-04-22T04:35:26+5:30
मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सूचित करूनही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. मात्र, बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व आवश्यक सेवा ...
मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सूचित करूनही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. मात्र, बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यानुसार दुपारी पालिका कर्मचाऱ्यांनी बाजार, बसस्थानक, आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी केल्यानंतर संपूर्ण बाजार बंद झाला. जोडीला पोलीस कर्मचारी असल्याने सर्वच दुकाने बंद झाली होती. दुपारनंतर केवळ दवाखाने व मेडिकल सुरू होते. बसस्थानकात बसेस फेऱ्या येत नसल्याने बसस्थानकही शांत होते.
बससेवेच्या शंभर फेऱ्या बंद
सार्वजनिक वाहतूक सुरू असली तरीही प्रवासी संख्या नसल्याने मेहकर, वाशिम, पुसद, रिसोड आगारांतून निघणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या सर्व आगारांतून औरंगाबाद, पुणे, नाशिक, जालनाकडे जाणाऱ्या शंभरपेक्षा जास्त बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. सध्या सिंदखेडराजा बसस्थानकातून जालनापर्यंत जाता येते. त्यासाठी केवळ पाच ते सहा बसेस सुरू आहेत. या व्यतिरिक्त कोणतीच बस नसल्याने लोकही बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.
तहसील परिसर शांत
खरेदी-विक्री व्यवहार तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून होणारी मोजणी, अभिलेखातून देण्यात येणाऱ्या नकला हे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सर्वाधिक वर्दळ असलेल्या तहसील परिसरात शांतता दिसून येत आहे.
बुधवारपासून वेळेत बदल
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक सेवा सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.