ज्वारीला मिळणार २,६२० रुपये क्विंटल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:14 PM2021-06-07T12:14:24+5:302021-06-07T12:14:33+5:30
Khamgaon News : चालू २०२०-२१ या वर्षात उत्पादित होणाऱ्या संकरित ज्वारीला २६२० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : भरडधान्य खरेदी योजनेंतर्गत ज्वारी पिकाची आधारभूत किंमत शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार चालू २०२०-२१ या वर्षात उत्पादित होणाऱ्या संकरित ज्वारीला २६२० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार आहे, तर मालदांडीला २६४० रुपये प्रतिक्विंटलचा भाव ठरवण्यात आला आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने २ जून रोजीच्या आदेशानुसार भरडधान्याच्या खरेदीसाठी यंत्रणाही ठरवून दिली आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धान्य विकावे लागू नये, यासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबवली जाते. रबी हंगामात ज्वारी, मका या धान्याची लागवड केली जाते. या धान्यासाठी (रबी) शासनाने आधारभूत किंमत ठरवली आहे. त्यानुसार मका व ज्वारीची खरेदी केली जाणार आहे. राज्यात खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन तर आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्वारीची खरेदी ३ जून ते ३० जून या कालावधीतच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. एफएक्यू दर्जाची ज्वारी खरेदी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी आहे, तर जिल्हास्तरीय समितीने ठरवल्यानुसार जिल्ह्यात केंद्रांची नियुक्ती केली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी करावी ऑनलाइन नोंदणी
ज्वारी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जातीची नोंद म्हणून स्वयंघोषणापत्र शेतकऱ्यांकडून भरून घेतले जाणार आहे.