जिल्ह्यात ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:27+5:302021-07-30T04:36:27+5:30
खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरवर पेरणीचे नियोजन होते. त्यापैकी ६ लाख ८२ हजार ३०३.३० हेक्टरवर ...
खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरवर पेरणीचे नियोजन होते. त्यापैकी ६ लाख ८२ हजार ३०३.३० हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झोलली आहे. नाही म्हणायला जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ९९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. मात्र चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा तालुक्यासह अन्य ठिकाणी मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सध्या कृषी विभागाने सुरू केले आहेत. त्यामुळे पेरणीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. परंतु जिल्ह्यात पिकांच्या वाढीसाठी व फलधारणेसाठी आवश्यक असलेला पाऊस झालेला आहे. त्यातच आता पावसाने विश्रांती दिलेली असल्याने शेतकरी एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यासाेबतच तुरळक स्वरूपात पडणारा पाऊस जमिनीत खोलवर जिरावा यासाठी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त झाले असल्याचे चित्र आहे.
--सोयाबीनचा पेरा सर्वाधिक--
जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून तेलबियांचा विचार करता एकूण क्षेत्रापैकी ४ लाख ११ हजार ८२२.४४ हेक्टरवर सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल व इतर तेलबियांचा पेरा शेतकऱ्यांनी केला आहे. ३५ हजार ९११ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कडधान्याचा पेरा केलेला आहे. तर एकूण अन्नधान्याचा विचार करता १ लाख ५२ हजार २३२ हेक्टरवर तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बारी, मका लावगड शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचा पेरा १ लाख ६८ हजार ८७९ हेक्टरवर झाला असून उसाची लागवडही जिल्ह्यात २४३ हेक्टरवर आहे.
--३ ऑगस्टपर्यंत तुरळक पाऊस--
जिल्ह्यात आगामी पाच दिवस अर्थात ३ ऑगस्टपर्यंत विखुरलेल्या व तुरळक स्वरूपात पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे एकप्रकारे पावसाची उघडीपच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
--आंतरमशागतीला प्राधान्य द्यावे--
पावसाने सध्या उघडीप दिलेली असल्याने या कालावधीत रस शोषणारी अळी तथा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी पिकांवर सकाळच्या वेळी करावी. तथा वाऱ्याच्या दिशेनेच ती करावी. जोरदार वारा असल्यास फवारणी टाळावी. दरम्यान आंतरमशागतीला प्राधान्य देऊन पिकांमध्ये हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी असे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले.