किनगाव जट्टू परिसरातील पेरण्या खोळंबलेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:23 AM2021-06-22T04:23:40+5:302021-06-22T04:23:40+5:30
किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे ...
किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने बळीराजाने गतवर्षीची मरगळ झटकून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन नव्या उमेदीने बँकेचे कर्ज काढून सावकाराचे दारे ठोठावून महागडे बी बियाणे, रासायनिक खते आणून पेरणीला सुरुवात केली होती. कपाशी व काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली होती, परंतु पाच दिवसांपासून कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. गतवर्षी दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर सोयाबीन सोंगणीच्यावेळी
अतिवृष्टी झाल्यामुळे उभे सोयाबीन भिजले. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे दर गगनाला भिडले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करून सोयाबीन पेरणी केली ते पावसाअभावी उगवते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
पाच दिवसांपासून पावसाची विश्रांती
परिसरात हलक्या सरी पडल्या तरी आजूबाजूच्या भागात दमदार पाऊस पडत असल्याने आपल्या भागात सुद्धा पाऊस पडेलच या आशेने व हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुरुवात चांगल्या प्रकारे झाली होती, परंतु आता पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत, ते आता चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे नजरा लावून आहेत. ज्यांच्या पेरण्या बाकी आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या लांबवल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नावर फरक पडत असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.
दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्र आटोपत आले आहे. तरीसुद्धा अजून परिसरातील नद्या- नाले कोरडे आहेत. गुरांना विहिरीतून शेंदून पाणी पाजावे लागत आहे. येथे आज रोजी सुद्धा पाणीटंचाई असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुद्धा चालू आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास पेरणी केलेले व उगवलेले पिकाचे नाजूक कोमटे उन्हामुळे जळतील अशी शंका दिवसेंदिवस निर्माण होत आहे.