खारपाणपट्टय़ात वाढली टरबुजाची लागवड
By admin | Published: December 18, 2014 01:07 AM2014-12-18T01:07:44+5:302014-12-18T01:07:44+5:30
आधुनिक शेतीची कास : मल्चिंग पद्धतीने लागवड करण्यावर भर.
पंजाबराव ठाकरे / संग्रामपूर (बुलडाणा)
खारपाणपट्टय़ात मल्चिंग पेपरच्या वापराने टरबूज लागवडीचे क्षेत्रफळ वाढते आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वा पर करण्यात युवा शेतकर्यांची आघाडी दिसत आहे. यासाठी शासनाचे आर्थिक सहाय्य प्रोत्साहन ठरत असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर प्लास्टिक पेपरचा अवलंब करून टरबूज लागवडीचे टारगेट आहे. तालुक्यात खारपाणपट्टय़ाचा वाढता प्रभाव पाहता भूगर्भातील क्षारयुक्त पाणी सिंचनासाठी बाधा ठरत आहे. यामुळे जमिनीची पोत खराब होऊन चोपण होण्याचे प्रमाण वाढत आहे. अर्थात जमिनीचा सामू वाढता आहे. म्हणून या भागातील बागायती क्षेत्र वाढण्याऐवजी घटत आहे. बारमाही बागायतीसाठी जमीन निरोगी असावी म्हणून भूपृष्ठावरील पाण्याची गरज आहे. जोपर्यंंत जमिनीवरील पाणी पिकासाठी मिळणार नाही तोपर्यंंत या भागात भरपूर पाण्याची लांब दिवसाची पिके घेण्याचे क्षेत्रफळ वाढणार नाही. अशी स्थिती असल्याने पारंपरिक पद्धतीनुसार बागायती करणार्यांचा हिरमोड होत आहे; परंतु यामध्ये युवा शेतकर्यांनी बदल करण्यास सुरुवात केल्याने पाण्याचा अपव्यय टाळून केवळ पिकाच्या झाडापुर तेच पाणी देण्यासाठी व शेती तणमुक्त राहावी यासाठी मल्चिंग पेपर हा पर्याय स्वीकारण्यात हा भाग पुढाकार घेत आहे. गतवर्षी या भागासाठी कृषी विभागाकडून ६ ते ७ हेक्टरचे लक्ष्यांक होते. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी व टरबूज उन्हाळी पीक उत्पादन देणारे असल्याने यावर्षात २२ हेक्टरचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. तालुका कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकर्यांमध्ये याचा प्रसार केल्याने यंदा क्षेत्रफळात वाढ झाली आहे. जवळपास ४0 हेक्टर क्षेत्रफळावर टरबूज लागवड केली जाणार असून, पैकी २२ हेक्टर क्षेत्रफळामध्ये मल्चिंग पेपरचा वापर तर १८ हेक्टर क्षेत्रफळ विना मल्चिंग लागवड केली जाणार आहे. मल्चिंगमुळे तण नियंत्रण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. निंदणाचा खर्च वाचविता येतो. फळे सारख्या आकाराची व दज्रेदार तयार होतात. त्यामुळे बाजारात मागणी राहते. पाण्याचा वापर फक्त वेलापुरताच होत असल्याने इतर जमीन खराब होत नाही. शासनाच्या या योजनेमुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे.