पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करावी- राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:18+5:302021-05-23T04:34:18+5:30
हिवरा आश्रमः खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणांची उगवणक्षमता तपासून घ्यावी.पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करावी.पेरणी करताना रुंद सरी ...
हिवरा आश्रमः खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणांची उगवणक्षमता तपासून घ्यावी.पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करावी.पेरणी करताना रुंद सरी वरंबा व इतर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी केले.
खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी बी.बी.एफ. (रुंद सरी वरंबा) व पट्टा पद्धतीने करण्याबाबत ट्रॅक्टर चालक व मालक यांचे प्रशिक्षण गजरखेड येथे गुरुवारी पार पडले. या पद्धतीने पेरणी केल्यानंतर होणाऱ्या फायद्याबाबत वसंत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बीबीएफ यंत्राबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित चालकांना पेरणी करताना काय काळजी घ्यावी, बियाणे किती खोलीवर पडणे आवश्यक आहे, ट्रॅक्टरचा वेग किती असावा इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्याने बियाणांची बचत होते.जास्त पाऊस झाल्यास जास्तीचे पाणी सरीद्वारे वाहून जाते.कमी पाऊस झाल्यास पाणी सरीमध्ये मुरुन पावसाच्या खंड कालावधीत पिके तग धरू शकतात. सरी पडत असल्याने शेतभर हवा खेळती राहते़ त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. सरीद्वारे फवारणी करणे सोयीचे होते. इत्यादी फायदे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्याने होत असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी राठोड यांनी सांगितले. या प्रशिक्षणाकरिता तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी सुधाकर कंकाळ, पिंपळगाव उंडाचे कृषी सहायक किशोर इंगळे, ट्रॅक्टर मालक विठ्ठल वडुळे, चालक शिवशंकर लाकडे , बुद्धेश्वर सरकटे, अशोक लाकडे, अमोल लाकडे, प्रदीप लाकडे, परसराम गिर्हे, बबन लाकडे, रामेश्वर लाकडे इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.