पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरण्या खाेळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:02+5:302021-06-17T04:24:02+5:30
दुसरबीड : परिसात मृग नक्षत्रात पावसाने जाेरदार हजेरी लावली हाेती़ या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची ...
दुसरबीड : परिसात मृग नक्षत्रात पावसाने जाेरदार हजेरी लावली हाेती़ या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली़ त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खाेळंबल्या आहेत़ दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे़
दुसरबीड, किनगाव राजा परिसरात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली़ या पावसाने बळीराजा सुखावला व शेती मशागतीच्या कामाला जोमाने लागला़ मात्र, काही दिवसांमध्येच पुन्हा त्याला पावसाची वाट पाहण्याची वेळ आली़ यावर्षी बियाण्याचे भाव दुप्पट-तिप्पट वाढले़ बियाणे खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली़ मागील वर्षी दुबार आणि तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढावले हाेते़ हातात आलेल्या पिकाचे संततधार पावसामुळे नुकसान झाले़ विमा काढलेला असूनही मदत मिळाली नाही़ यावर्षी दुबार पेरणीचे संकट ओढावले तर शेताची पेरणी करणे अशक्य आहे़ सध्या स्थितीमध्ये बाजारामध्ये सोयाबीन बियाण्याची उपलब्धता नाही़ चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे़ पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणी बंद केली आहे़ काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे़ मात्र, पाऊसच नसल्याने ती उगवेल किंवा नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे़