पेरलेले उगवलेच नाही;  बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का वाढेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:46 PM2018-11-12T15:46:06+5:302018-11-12T15:46:36+5:30

बुलडाणा: पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.

The sown did not grow; rabi sowing percentage dropped in Buldana district | पेरलेले उगवलेच नाही;  बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का वाढेना 

पेरलेले उगवलेच नाही;  बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का वाढेना 

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सरासरी १ लाख ५७ हजार ६७६ हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत २२ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जमिनीतील ओलाव्याअभावी अनेकांचे पेरलेले हरभरे उगवले नाही. यामुळे जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्काही वाढत नसल्याचे दिसून येत आहे. 
रब्बी हंगामातील प्रमुख आणि नगदी पीक असलेल्या हरभरा पिकावर यावर्षी सुरूवातीपासूनच संकट आले आहे. पावसाळ्यात पर्जन्यमान कमी राहिल्याने जमिनीमध्ये ओलावा टिकून राहिला नाही. त्यामुळे सध्या शेतजमीनी कोरड्या असल्याने शेतकºयांना रब्बी हंगामाची पीके घेण्यास अडचणी येत आहेत. बहुतांश शेतकºयांनी हरभरा पिकाची पेरणी केली; मात्र ओलीतीअभावी हरभरा निघाला नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात हरभरा पिकाचे क्षेत्र ६१ हजार २४८ हेक्टर आहे. त्यापैकी २० हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काहींचे हरभरा पीक निघाले नसल्याने शेतकºयांनी रब्बी पेरणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी होणाºया हरभरा पिकाची आतापर्यंत केवळ ३४ टक्के पेरणी झाली आहे. तर एकूण रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ५७ हजार ६६७ हेक्टर असताना जिल्ह्यात १५ टक्के म्हणजे २२ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. एकंदरीत यावर्षी  जिल्ह्यातील रब्बीची परिस्थिती चिंताजनक दिसून येत आहे.  

चारा पिकावरही दुष्काळ
जनावरांसाठी रब्बीमध्ये घेतल्या जाणाºया चारावर्गीय पिकावरही यावर्षी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अन्नधान्य आणि चारा पीक म्हणून महत्त्व असलेल्या ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ४५१ हेक्टर आहे. त्यापैकी ९६७  हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारीचा केवळ आठ टक्के पेरा झाला असल्याने चाºयाचाही प्रश्न निर्माण होणार आहे. 

पावसाची ओढ रब्बीच्या मुळावर 
खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ रब्बीच्या मुळावर निर्माण झाली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनीही यावर्षी रब्बी हंगामाला शेवटपर्यंत पाणी पुरणार नाही, या भितीने पेरणी करण्याचे टाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट दिसून येत आहे. 


गहू पेरणी एक टक्क्यावर
जिल्ह्यात हरभरा पिकापाठोपाठ गहू पिकाची पेरणी होते. गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ६६ हजार ५०७ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ८३७ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत गहू पिकाची पेरणी करण्यता आली आहे. परतीच्या पावसाच्या भरवश्यावर अनेक शेतकरी कोरडवाहू शेतीतही गहू पीक घेतात. मात्र यावर्षी परतीच्या पावसानेही दगा दिल्याने जिल्ह्यात गहू पिकाची पेरणी केवळ एक टक्का झाली आहे.

Web Title: The sown did not grow; rabi sowing percentage dropped in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.