सोयाबीनवर हिलीओथीस अळीचे आक्रमण!
By admin | Published: August 10, 2015 12:54 AM2015-08-10T00:54:45+5:302015-08-10T00:54:45+5:30
बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, सल्ला घेऊच शेतक-यांनी उपाय करण्याचे अवाहन.
बुलडाणा : दोन दिवस झालेल्या संततधार पावसानंतर आता सोयाबीनवर हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही उंट अळी, लष्करी अळी असल्याची चर्चा शेतकर्यामध्ये सुरू आहे; मात्र शेतकर्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. माहिती व मार्गदर्शन न घेता केलेल्या उपायांमुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनचा पेरा आहे; मात्र पेरणी झाल्यानंतर तब्बल दीड महिना पावसाने उघाड दिल्याने अनेक ठिकाणच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील सोमवार, मंगळवार असे दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे उरलेल्या पिकांना जीवदान मिळाले. पावसाअभावी कशीबशी तग धरून असलेली सोयाबीनची झपाट्याने वाढ होत आहे; मात्र आता पुन्हा सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. सोयाबीनवर काही ठिकाणी हिलीओथीस अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बुलडाणा आणि मेहकर तालुक्यात अळीचा मारा अधिक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. ही अळी मारण्यासाठी शेतकर्यांनी फवारणी सुरू केली आहे. मात्र नेमकी अळी कोणती आहे, त्यासाठी फवारणी करताना कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा, याबाबत शेतकर्यांमध्ये साशंकता आहे. त्यासाठी कृषितज्ज्ञांचे शेतकर्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. यासंदर्भात कृषी विभागातील अधिकार्यांशी संपर्क केला असता, सोयाबीनवर नेमकी कोणती अळी पडली, याची माहिती घेणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा उंट अळीचा प्रादुर्भाव नाही, असेही सांगण्यात आले आहे.