सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:20 AM2017-07-20T00:20:55+5:302017-07-20T00:20:55+5:30
वन्य प्राण्यांचा हैदोस, दुबार पेरणीचे संकट : २० टक्के बियाणांचीच उगवण
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/बोरखेड : जिल्ह्यात पावसाने दिलेली दडी, बोगस बियाण्यांचा भडीमार त्यातच वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: मेटाकुटीस आला आहे. घाटावरील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून, पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण सात एकरावर ट्रॅक्टर फिरविला आहे. परिसरात पाऊस लांबत असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोनाळा, सायखेड, पिंगळी, वारखेड, सगोडा, पळसोडा, दानापूर या गावात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यामुळे अखेर जास्तीत जास्त दुबार तिबार पेरणी करण्याचे संकट कोरडवाहू शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे; तसेच काही शेतकऱ्यांची प्रथम पेरणी करण्याचेसुद्धा बाकी आहे. पुढील घर खर्च व मुलांचे शिक्षण, लग्न, कसे काय भागवावे, अशा विविध संकटात कोरडवाहू शेतकरी अडकला असतानाच, बोरखेड गावालगत गट ५३ मध्ये गोपाल व्यास या शेतकऱ्याने सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने, संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे. या शेतकऱ्याने २० जून रोजी शेतात सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाने लांब दडी मारल्याने त्यातील बरेच बियाणे जमिनीच्या आत खराब झाले. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सोयाबीन निघेल, या आशेने ते थांबले. अखेर १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून पावसाचे थोडे आगमन झाले. परिणामी, शेतात जास्तीत जास्त सोयाबीन निघेल, अशी आशा त्यांना होती; मात्र १८ जुलै रोजी शेतात फेरफटका मारला असता, शेतात फक्त २० टक्के सोयाबीन पीक उगवले, ताबडतोब त्यांनी दुसरे पीक घेण्याकरिता सात एकरातील सोयाबीनवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला.
वन्य प्राण्यांनी उद्ध्वस्त केले सोयाबीन
धाड : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण असताना वन्य प्राण्यांकडून शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. धाडनजीक ग्राम बोरखेड बुलडाणा शिवारात शेतकऱ्यांचे तब्बल पाच एकरावरील सोयाबीन वन्य प्राण्यांनी नासधुस करीत उद्ध्वस्त केले आहे. या घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच निसर्गाचा लहरीपणा, सतत पडणारा दुष्काळ, या प्रकाराने शेतकरी हैराण असताना बोरखेड धाड या गावातील अंकुश साहेबराव वाघ यांचे गट नं.११५ मधील साधारण ५ एकरावरचे सोयाबीन पीक हे रानरोही, हरीण या वन्य प्राण्यांनी १५ जुलै रोजी नासधूस करीत उद्ध्वस्त केले. यावर्षी पुरेसा समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांची प्रतवारी चांगली आहे. गेल्या चार पाच दिवसात अंकुश वाघ यांचे शेतात हरणांचा कळप व रानरोही यासारख्या वन्य प्राण्यांची सरसकट पाच एकरावरचे सोयाबीन उद्ध्वस्त केल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या काही वर्षात या भागात कृषी क्षेत्रावर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे पिकांचे नुकसान होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. वन्य प्राण्यांमुळे शेतकरी वर्गास हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने उपाय योजना करुन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.