सोयाबीनला कोंब, उडिदावर बुरशी!
By Admin | Published: October 4, 2016 02:00 AM2016-10-04T02:00:19+5:302016-10-04T02:00:19+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त; परतीच्या पावसाने केले नुकसान.
बुलडाणा, दि. ३- जिल्ह्यात सोयाबीन व उडीद सोंगणीचा हंगाम सुरू आहे; परंतु परतीच्या पावसाने सोयाबीन व उडीद सोंगणीच्या हंगामात अडथळा निर्माण केला आहे. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या या पावसामुळे सोंगलेल्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत; तर उडीद पिकावर बुरशी चढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून शेतकर्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. तीन वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन, उडीद ही पिके चांगली बहरली हो ती. जिल्ह्यात खरीप हंगामात ७ लाख ४९ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवड झालेले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात ३ लाख ७८ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन व १ लाख ६१ हजार ६00 हेक्टरवर कपाशी आहे. त्यापाठोपाठ तूर, मूग, उडीद आणि इतर कडधान्य १ लाख ४३ हजार ५00 हे क्टर क्षेत्रावर आहे. यंदा सुरुवातीलाच भरपूर पावसाच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे गेल्या तीन वर्षांपासून नुकसान झेलणार्या शेतकर्यांच्या खरीप हंगामाकडून आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु सोयाबीन व उडीद सोंगणीच्या हंगामातच जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकर्यांना सोयाबीन सोंगणीला अडथळा निर्माण होत आहे. या जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा शेतकर्यांना फायदा होण्याऐवजी अधिकांश प्रमाणात नुकसानच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जून महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून चांगली सुरुवात करणार्या पावसाने मध्यंतरी दीर्घ दडी मारल्यामुळे सोयाबीनसोबतच खरिपातील इतर पिकेही करपायला लागली होती; तर अनेक ठिकाणचे सोयाबीन पिवळे पडले होते. अशाही स्थितीत तग धरून असलेल्या शेतकर्यांनी आर्थिक चणचण भासत असतानाही पैशांची जुळवाजुळव करून सोयाबीनच्या सोंगणीचे काम हाती घेतले. सुमारे २५ टक्के शेतकर्यांनी सोयाबीनच्या सुड्या शेतशिवारांमध्ये रचून ठेवल्या; मात्र अचानक गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या पावसामुळे सोंगलेले सोयाबीन बहुतांशी भिजले असून, त्यास कोंब फुटत आहेत, तर सोंगलेल्या उडीद पिकालाही बुरशी चढत आहे. परतीच्या पावसाने शेतकर्यांवर नवीन संकट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
विमा कंपनीकडे हजारो शेतकर्यांच्या तक्रारी
खरिपातील पिकांचा पीकविमा काढलेल्या शेतकर्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरंस कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. पिकांच्या नुकसानीबाबत शेतकर्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी कराव्या, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार विमा कंपनीकडे नियमित हजारांवर शे तकर्यांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती रिलायन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक विक्रम बलोदे यांनी दिली आहे. शेतकर्यांच्या नुकसानीची दखल घेतल्या जाणार असून, कंपनीतर्फे शेतकर्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ढगाळ वातावरणाचा बसतो फटका
पावसाबरोबरच ढगाळ वातावरण राहत असल्याने या वातावरणाचा कपाशी पिकाला फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर उडीद सोंगून लावलेल्या सुडीमध्ये बुरशी लागत आहे. परिणामी, सोयाबीन व उडीद उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.