कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:25 PM2019-03-03T15:25:52+5:302019-03-03T15:25:56+5:30
खामगाव: सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातील शेतमाल विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचाही माल बाजारात येत असल्याने सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातील शेतमाल विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचाही माल बाजारात येत असल्याने सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. २१ फेब्रुवारी पासून पाच दिवसात तब्बल २३ हजार ९०६ क्विंटल सोयाबीनची आवक बाजार समितीत झाली.
गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन तसे कमीच झाले. पाऊस कमी झाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन वाळले. ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन उत्पादनात घट आली आहे. घाटाखाली अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सोंगण्याचीही गरज पडली नाही. खामगाव तालुक्यात ४१ हजार २४० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले, तरी सुरूवातीच्या काळात सोयाबीनला फारसे भाव नव्हते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी सोयबीनची विक्री केली नव्हती. गत दोन महिन्यापासून सोयाबीनच्या भावात वाढ होत गेली. सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सोयाबीनची आवक वाढल्याचे दिसून येत आहे.
हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीनला ३३९९ रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव देण्यात आला. परंतु खासगी बाजार व हमीभावाने खरेदी केंद्रावरील भावात फारसी तफावत नसल्याने शेतकºयांनी खुल्या बाजारातच सोयाबीन विकणे पसंत केले.
(प्रतिनिधी)