८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:09+5:302021-05-01T04:33:09+5:30
मेहकर: तालुक्यातील एकूण वहिती क्षेत्रापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्र हे या खरीप हंगाम २०२१ मध्ये सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. ...
मेहकर: तालुक्यातील एकूण वहिती क्षेत्रापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्र हे या खरीप हंगाम २०२१ मध्ये सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. सोयाबीनला बाजारभाव हे साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले आहे. समोरचा खरिप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी आतापासूनच बियाण्यांचे नियोजन करून त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे असल्याने मेहकर कृषी विभागाने याबाबत गावपातळीवर व सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे.
सर्वप्रथम चांगल्या बियाण्याची निवड करणे हा मोठा प्रश्न आहे. चांगले बियाणे कसे असावे तर बियाणे हे जाड, टरफले न निघालेले, काढणीच्या वेळी गंजी किंवा पसर भिजलेली नसावी. त्यात इतर जातीची बियाणे मिश्रण नसावे व महत्त्वाचे म्हणजे त्याची उगवण शक्ती चांगली असावी. शेतकऱ्यांनी पेरणीनंतर नत्रयुक्त खताची मात्रा देऊ नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. सोयाबीन पेरताना रुंद सरी वरंबा,पट्टा पद्धतीने पेरणी केल्यास पिकात हवा खेळती राहून कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकात सूर्यप्रकाश राहतो, पिकाच्या ताणाच्या अवस्थेत पाणी देणे सोपे होते आणि अंतरमशागत योग्य होऊन उत्पादनात वाढ होते. याबाबत सध्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अशी तपासा उगवणशक्ती
बियाणे उगवण शक्ती तपासणीकरिता स्वछ धुतलेले दोन बाय दोनचे गोणपाट घ्यावे. ते पाण्यात भिजवून त्यावर न निवडता शंभर सोयाबीनचे दाने एका ओळीत दहा याप्रमाणे दहा ओळीत मांडावे. त्यानंतर त्या गोणपाटाची व्यवस्थित गुंडाळी करून दोन्ही बाजूंनी दोरीने बांधून माठाजवळ किंवा थंड ठिकाणी जमिनीपासून उंचीवर ठेवून त्यावर दिवसात तीन वेळा पाणी शिंपडावे. चार दिवसांनी निरीक्षण करून किती बियाण्याला फुटवे आले, त्यावरून आपल्याला प्रतिएकरी किती बियाणे वापरावे, हे समजते. जर शंभर दाण्यापैकी सत्तर दाणे उगवले तर एकरी २५ किलो बियाणे, ७५ टक्के उगवण असेल तर २३ किलो बियाणे आणि ६५ टक्के उगवण असेल तर ३० किलो बियाणे प्रतिएकर पेरणी करावे. अशाप्रकारे बियाणे पेरणी केल्यास हेक्टरी रोपांची संख्या चार ते साडेचार लाख प्रति हेक्टरी होईल.
ज्या शेतकरी बांधवांकडे सोयाबीन बियाणे नसेल, त्यांनी आताच खुले बियाणे विकत घ्यावे. त्याची उगवण चाचणी करून पाहावी. कारण मागच्या वर्षी बहुतांश सोयाबीन भिजले असल्याने बियाणे खराब झाले होते. वेळेवर सोयाबीन मार्केटला मिळणार नाही. म्हणून आताच चांगल्या बियाण्याचे नियोजन करून आपली होणारी गैरसोय टाळावी.
प्रदीप खंडारे, कृषी सहायक, सोनाटी.