बुलडाणा तालुक्यात सोयाबीन बियाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:45+5:302021-06-04T04:26:45+5:30
धाड : बुलडाणा तालुक्यात यावर्षी ५६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. यापैकी बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात ...
धाड : बुलडाणा तालुक्यात यावर्षी ५६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. यापैकी बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे; परंतु यावर्षी कृषी आणि बियाणे महामंडळाच्या दुर्लक्षित कारभाराने तालुक्यात सोयाबीन बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असल्याचे चित्र आहे.
खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावर महामंडळाच्या महाबीज सोयाबीन बियाणे कृषी केंद्रांवरून गायब झाले असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना खाजगी कंपनीचे महागडे बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी महामंडळाच्या वतीने सोयाबीन बियाण्याचे दर जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सोयाबीनच्या एका बॅगमागे १ हजार १५० ते १ हजार २०० रुपये जास्तीचे पैसे देऊन शेतकऱ्यांना बियाणे घ्यावे लागते आहे; परंतु याठिकाणी तालुक्यात आतापर्यंत मागणी केलेल्या बियाण्याच्या साठ्यापैकी केवळ १० टक्केच साठा महामंडळाने कृषी केंद्रधारकांना दिला आहे.
काय म्हणते बियाणे महामंडळ...
यासंदर्भात बियाणे महामंडळाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कृषी विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याची सूचना केलेली असल्यामुळे बाजारात महाबीजचे बियाणे आले नाही.
आंदोलनाचा इशारा
कृषी विभागाने तालुक्यातील १ हजार ३७६ शेतकऱ्यांची एक यादीच जाहीर केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध आहे, ते इतर शेतकऱ्यांनी घेण्याची व्यवस्था कृषी विभागाने केली आहे. एकीकडे बियाण्याची भीषण टंचाई आणि दुसरीकडे खाजगी कंपनीचे महागडे बियाणे अशा विपरीत परिस्थितीत शेतकरी अडकला असून, शासनाने यावर तातडीने उपाययोजना करत तात्काळ महामंडळाचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना, युवासेना बुलडाणा तालुका यांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनात केला आहे. तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
महाबीजचे बियाणे तातडीने उपलब्ध करून, कृषी विभागाच्या आणि बियाणे महामंडळाच्या कारभाराची तात्काळ चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी.
प्रमोद वाघुर्डे, तालुकाप्रमुख, युवासेना शिवसेना बुलडाणा.
कृषी विभागाने माझे नाव घरचे बियाणे शिल्लक असणाऱ्या यादीत टाकले आहे. मी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. माझ्याजवळ जवळपास २६ क्विंटल बियाण्याचे सोयाबीन शिल्लक असल्याचे या यादीत दिसत आहे; परंतु माझ्या जवळ सोयाबीनचा एक दाणाही नाही.
-प्रमोद बोर्डे, शेतकरी, धाड.