खरीप हंगामात साेयाबीन बियाणे घरचे वापरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:36 AM2021-05-09T04:36:37+5:302021-05-09T04:36:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेले सोयाबीन चालूवर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात. गावनिहाय बियाणे उपलब्धता जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून, त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी, बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये, बियाणे साठवताना सोयाबीनची सातपेक्षा जास्त थर बियाण्याची पोती एकमेकांवर ठेवू नये, बियाणे उन्हात ठेवू नये, बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी. शेतकऱ्यांनी ६० टक्केपेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
उगवण क्षमतेनुसार बियाण्याचा वापर
उगवण क्षमता ७० टक्के बियाणे एकरी ३० किलो, उगवण क्षमता ६९ टक्के बियाणे एकरी ३०.५० किलो, उगवण क्षमता ६८ टक्के बियाणे एकरी ३१ किलो, उगवण क्षमता ६७ टक्के बियाणे एकरी ३१.५० किलो, उगवण क्षमता ६६ टक्के बियाणे एकरी ३२ किलो, उगवण क्षमता ६० टक्के असल्यास बियाणे एकरी ३५ किलो वापरावे.