शेत रस्ता अडविल्याने सोयाबीन सुडी अद्यापही शेतातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:56+5:302021-01-10T04:26:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : किरकोळ वादातून शेजारील शेतकऱ्याने शेतरस्ता अडवल्याने शेतातील सोयाबीन पिकाची काढणी खोळबंली असून अद्यापही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : किरकोळ वादातून शेजारील शेतकऱ्याने शेतरस्ता अडवल्याने शेतातील सोयाबीन पिकाची काढणी खोळबंली असून अद्यापही सोयाबीनची सुडी शेतात तशीच पडून आहे. या प्रकाराने मानसिक तणावात आलेल्या तालुक्यातील महिमळ येथील शेतकरी तुकाराम नामदेव शेळके यांनी विषारी औषध प्राशन केले आहे.
तालुक्यातील महिमळ येथील शेतकरी तुकाराम शेळके गत चाळीस वर्षांपासून गट क्र.१४९ व १५० च्या पूर्व दक्षिण नंबर धुऱ्याने पूर्व-पश्चिम जाणे-येणे करतात. त्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता सुध्दा नाही. दरम्यान गट नंबर १४४ मध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १४३ प्रमाणे शेतात जाण्यायेण्यासाठी ट्रॅक्टर, बैलगाडी ने-आण करण्याकरिता रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते महसुली कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यातच त्यांच्या शेजारील इंगळे नामक शेतकऱ्याने नेहमीचा शेत रस्ता सोयाबीन हंगामापासून अडविला आहे. त्यामुळे शेतात सोंगूण ठेवलेली सोयाबीन सुडीची अद्याप मळणी देखील होऊ शकलेली नाही. काही हात उसने घेतलेले तसेच बँक व खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सोयाबीन काढणे गरजेचे असतांना, शेतात पडलेली सोयाबीन केवळ रस्ता नसल्याने काढता येत नाही. या सर्व प्रकाराच्या मनस्तापाचा अतिरेक झाल्यामुळे शेतकरी तुकाराम शेळके यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला आहे. विष प्राशन केल्याचे समजताच त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, तुकाराम शेळके यांचा मुलगा नितीन शेळके यांनी तहसीलदार अजितकुमार येळे यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. तहसीलदारांनी मंडळाधिकारी, तलाठी व अन्य तहसील कर्मचाऱ्यांना शेत रस्ता मोकळा करून देण्यासाठी महिमळ येथे पाठवले. मात्र, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमक्ष इंगळे यांनी शेत रस्ता मोकळा करण्यास नकार दिला.त्यामुळे, उपरोक्त अधिकाऱ्यांनी येवले नामक शेतकऱ्याच्या शेतातून पीडित शेतकऱ्याला सोयाबीन काढण्यासाठी तात्पुरता पर्यायी शेत रस्ता उपलब्ध करून दिला आहे.
शेत रस्त्याच्या प्रकरणांचा निपटारा व्हावा !
काढणीपश्चात अनेक दिवसांपासून सोयाबीनची सुडी शेतातच असल्याने सुडीत उंदरांनी उच्छाद मांडून मोठे नुकसान केले आहे. केवळ शेत रस्त्याअभावी सदर शेतकऱ्याच्या जिवावर हा प्रसंग बेतला असल्याने महसूल विभागाकडे शेत रस्ता संदर्भाने प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.