पाच हजार हेक्टरवर सोयाबीन प्रात्याक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:03 AM2017-05-18T00:03:25+5:302017-05-18T00:03:25+5:30
राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान: सोयाबीन उत्पादन वाढीसाठी होणार प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात यावर्षी सुमारे ३ लाख ८५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल, असे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येकी १० हेक्टरनुसार, ५०० प्रात्याक्षिक ५ हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणार आहे.
पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा व घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना खात्रेशीर मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात आहे. यातून राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान (सोयाबीन) पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. या अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बी-बियाणे पुरवठा, एकात्मिक मूलद्रव्ये व्यवस्थापन तसेच या घटकाचा अंतर्भाव होता. ही योजनेची अंमलबजावणी खरीप पेरणी सुरु झाल्यानंतर कृषी विभागाकडून करण्यात येणार असून, यातून जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे २०१७-१८ मध्ये या अभियानांतर्गत सोयाबीन पिकांचे एकूण ५ हजार हेक्टरवर ५०० प्रात्यक्षिक राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विविध बियाणे, इतर कृषी निविष्ठा, पीक संरक्षण उपकरणे, कृषी औजारे व कार्यक्षम पाणी उपस्याची साधणे घेण्याकरिता अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. यासाठी ८२९.७९ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
यंदा प्रात्याक्षिक क्षेत्र वाढले!
राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यातील तेराही तालुक्यात यावर्षी क्षेत्रात वाढ होऊन ५ हजार हेक्टर करण्यात आले आहे. गतवर्षी २०१६-१७ मध्ये ४ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन प्रात्याक्षिक घेण्यात आले होते. यात प्रति प्रकल्प १०० हेक्टर क्षेत्रानुसार बुलडाणा तालुक्यात ३, मोताळामध्ये ४, मलकापूर ३, चिखली ५, खामगाव ४, नांदुरा ३, जळगाव जा.३, संग्रामपुर ३, शेगाव ३, मेहकर ४, लोणार ३, दे.राजा ३, सिं.राजा २ अशा एकूण ४३ प्रकल्पांचा समावेश होता.