लोणारमध्ये स्वयंचलीत हवामान केंद्रासाठी अखेर जागा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 03:33 PM2020-01-05T15:33:54+5:302020-01-05T15:34:07+5:30
तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : हवामानातील अनाकलयीन बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या लोणार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. तहसिल कार्यालय परिसरातील दहा बाय दहा मिटरची जागा या हवामान केंद्रासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान या केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री आॅफ अर्थ सायन्स विभागातंर्गत येत असलेल्या नागपूर येथील हवामान केंद्राच्या दोन अधिकाऱ्यांनी मध्यंतरी लोणार सरोवर येथे भेट देऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आता ही जागा उपलब्ध झाली असल्याची माहिती लोणारचे तहसिलदार नदाफ यांनी दिली. जे. आर. प्रसाद हे वैज्ञानिक आणि नागपूर हवामान विभागाचे आर. व्ही. पटोले यांनी ही भेट दिली होती. नागपूर खंडपीठात दाखल एका याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार लोणार मध्ये या वर्षामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुषगाने ही पाहणी या दोन वैज्ञानिकांनी केली होती.
आता लोणार येथील हवामान केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यानुषंगाने हे केंद्र उभारण्याच्या हालचाली लवकरच सुरू होत असल्याचे संकेत तहसिलदार नदाफ यांनी दिले आहे. हे केंद्र स्वयंचलीत असल्याने एकूण आठ पॅरामिटरमध्ये नागपूर आणि पुणे केंद्राला माहिती पाठविली जाईल.
लोणार परिसर संवेदनशील
हवामानाच्या दृष्टीने लोणार परिसर संवेदनशील आहे. २३ जुलै २०१३ रोजी येथे २४ तासात तब्बल १७ इंच म्हणजेच ४१९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी पर्जन्यमापक यंत्रातील पात्र हे तब्बल पाच वेळा बदलावे लागले होते. हा एक विक्रमच म्हणावा लागले हे हवामान केंद्र कार्यान्वीत झाल्यास लोणारच्या संवेदनशीलतेचीही नोंद घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे येत्या काळात त्वरेने हे केंद्र उभारण्यात यावे अशी मागणीही होत आहे.