‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना विशेष अनुदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:31 PM2018-02-20T19:31:54+5:302018-02-20T20:16:38+5:30
‘लोकमत’च्या या उत्स्फुर्त आणि प्रेरणादायी उपक्रमातील विविध श्रेणीतील ‘सरपंच अवॉर्ड’ विजेत्या १२ ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये, तर ‘सरपंच आॅफ द ईयर’ या श्रेणीत पुरस्कार मिळविणा-या पांगरखेड ग्रामपंचायतला २ लाख रूपये प्रोत्साहन अनुदान प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लोकशाहीचा स्तंभ असलेल्या सरपंचांना ग्रामविकासाची प्रेरणा मिळवी या उद्देशाने जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायतच्या सरपंचांना मंगळवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. ‘लोकमत’च्या या उत्स्फुर्त आणि प्रेरणादायी उपक्रमातील विविध श्रेणीतील ‘सरपंच अवॉर्ड’ विजेत्या १२ ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा निधीतून प्रत्येकी १ लाख रूपये, तर ‘सरपंच आॅफ द ईयर’ या श्रेणीत पुरस्कार मिळविणा-या पांगरखेड ग्रामपंचायतला २ लाख रूपये प्रोत्साहन अनुदान प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केली.
खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २० फेब्रुवारी रोजी आयोजित ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व बाबुजींच्या प्रतीमा पूजनाने करण्यात आली. भाऊसाहेब फुंडकर पुढे म्हणाले की, ग्राम विकास हा सरपंचावर अवलंबून असतो. त्यासाठी सरपंचाच्या हातात विविध अधिकार दिले आहेत. गावाचा विकास करण्यासाठी सरपंचाला अनेक शासकीय योजना दिल्या आहेत. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ मुळे सरपंचाना काम करण्यासाठी एक प्रकारची उर्जा मिळाली आहे. खेड्याचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. खेड्याचा विकास साधण्यासाठी सतत झटणा-या १३ सरपंचाना लोकमतने ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ दिला. गावात जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आदींमध्ये उल्लेखनीय कामगीरी करणा-या ग्रामपंचायत सरपंचांच्या कार्याचा ‘लोकमत’ने मोठा गौरव केला आहे. ‘लोकमत’च्या या पुरस्कारामुळे इतर सरपंचानाही ग्रामविकासासाठी प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकमत’च्या अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले यांनी केले. त्यांनी ‘लोकमत’ राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांवर प्रकाश टाकला. तसेच ‘लोकमत’कडून देण्यात येणा-या विविध पुरस्कारांविषयी माहिती दिली. यावर्षीपासून जिल्ह्यातील कर्तबगार सरपंचाना ‘लोकमत’कडून देण्यात येणाºया पुरस्कार निवडीसाठी जिल्हा परिषद आणि महसुल प्रशासनाचा सहभाग घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू विलास भाले, जुबेर शेख, नेत्रानंद आंबाळेकर, संभाजी भडे, सुदाम जोशी, खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे, पं.स.सभापती उर्मीला गायकी, डॉ. गोपाल गव्हाळे, अकोला ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरंपच, माजी सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच हा ग्रामविकासाचा अविभाज्य घटक - आकाश फुंडकर
गावचा सरपंच हा ग्राम विकासाचा अविभाज्य घटक आहे. सरंपच चांगला असेल तर गावचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. गावाच्या विकासासाठी सतत झटणा-या सरपंचाचा ‘लोकमत’ने सत्कार घडवूण आणला, असे मत खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड.आकाश फुंडकर यांनी केले. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याची प्रशंसा त्यांनी केली.