विशेष सभा बारगळली हा पालिकेचा विषय : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:29+5:302021-04-10T04:34:29+5:30
बुलडाणा : जयस्तंभ चौकातील जागा ही यापूर्वीच वाणिज्य वापरासाठी नगर पालिकेने आरक्षित ठेवली आहे. त्या जागेवर पुतळा उभारण्यासाठी ठराव ...
बुलडाणा : जयस्तंभ चौकातील जागा ही यापूर्वीच वाणिज्य वापरासाठी नगर पालिकेने आरक्षित ठेवली आहे. त्या जागेवर पुतळा उभारण्यासाठी ठराव घेण्यापूर्वी त्या जागेचा आधी पर्पज चेंज करावा लागतो. शिवाय असा ठराव घेणे म्हणजे नगर पालिकेचे आर्थिक नुकसान होणार होते. ही बाब नगर सेवकांच्या लक्षात आल्यामुळेच काल नगर पालिकने बोलाविलेली विशेष सभा २६ विरुद्ध ६ मतांनी बारगळली. यामध्ये कोणत्याही नगरसेवकावर दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती आ. संजय गायकवाड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
मागील एक महिन्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयस्तंभ चौकात उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवरून वादंग सुरू होते. या संदर्भात ८ एप्रिल रोजी नगरपालिकेने विशेष सभा बोलावून पुतळ्याच्या जागेचा विषय पटलावर घेतला. मात्र ही सभा कोरमअभावी रद्द झाल्यानंतर शहरवासीयांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आ. गायकवाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाला पूर्णविराम दिला. यावेळी कुणाल गायकवाड, स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. सुमित सरदार, कार्याध्यक्ष दिलीप जाधव, सचिव अशोक इंगळे, उपाध्यक्ष दादाराव गायकवाड, दिलीप दौलतराव जाधव, प्रा. एस. पी. हिवाळे, अनिल आराख उपस्थित होत. आ. गायकवाड यांनी पूर्वीच्या जागेवरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याचे सांगितले. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून टेंडर प्रोसेस झाली. पुतळ्याची ऑर्डरही दिली आणि समाजाच्या धम्मदानातून हा पुतळा उभा राहत असून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जयंतीदिनी या जागेवर भूमिपूजनही करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष सिद्धार्थ आराख, नितीन शिरसाट, सुमित गायकवाड, बाला राऊत, दीपक मनवर उपस्थित होते.