प्रलंबित विकास कामांसाठी विशेष परवानगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:23 AM2020-04-11T11:23:20+5:302020-04-11T11:23:26+5:30
गर्दीमुळे अडसर ठरणारी विकासकामे कोरोना संचारबंदीच्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राज्यातील विविध कामांना आवश्यक त्या अटींवर स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विशेष परवानगी दिली जात आहे. गर्दीमुळे अडसर ठरणारी विकासकामे कोरोना संचारबंदीच्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्या अनुषंगाने खामगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामास गुरूवारी सायंकाळपासून सुरूवात करण्यात आली आहे.
कोरोना या विषाणू संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे राज्यातील विविध विकासकामे गत १८ दिवसांपासून ठप्प झाली आहेत. याचा रस्ते आणि महामार्ग प्राधिकरणाला फटका बसला आहे. दरम्यान, संचारबंदीच्या काळात गर्दीचा अडथळा ठरणारी कामे पूर्णत्वास नेण्याचा कल लक्षात घेता, स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या अटींवर ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष परवानगी दिली जात आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी दिली जात असल्याने राज्यातील विविध विकास कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे.
सोशल डिस्टनसिंगचे करावे लागणार पालन!
कोरोना या विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने विकास कामांवर काम करणाºया मजुरांच्या आरोग्याची काळजी संबंधितांना घ्यावी लागणार आहे.सोबतच सोशल डिस्टनसिंग आणि मजुरांना मास्क तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. इतकेच नव्हे तर कामावर गर्दी होवू नये यासाठी मजुरांची संख्याही कमी करावी लागणार आहे.
कोरोनाच्या संचारबंदीमुळे रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकांºयांशी व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे संवाद साधला. त्यानंतर रस्ता कामाला सुरूवात करण्यात आली. या कामावर सोशल डिस्टनसिंग तसेच इतर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात.
- अॅड. आकाश फुंडकर
आमदार, खामगाव, विधानसभा