म्युकरमायकोसिससाठी उपजिल्हा रुग्णालयात विशेष शस्त्रक्रिया कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:32 AM2021-05-22T04:32:22+5:302021-05-22T04:32:22+5:30
बुलडाणा : देशात पुढील सहा ते सात महिन्यांत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
बुलडाणा : देशात पुढील सहा ते सात महिन्यांत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेमध्ये लहान मुले प्रादुर्भावग्रस्त होणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी आतापासून तयारीला लागावे. त्यासाठी जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विशेष बालरोग तपासणी कक्ष तयार करण्यात यावे, तसेच बेडची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. तसेच म्युकरमायकाेसिससाठी उपजिल्हा रुग्णालयात विशेष शस्त्रक्रिया कक्ष स्थापन करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोविडबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
रुग्णालयातील स्वच्छतेवर भर द्या
ऑक्सिजन दिलेल्या कोविड बाधित रूग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, म्युकरमायकोसिस आजाराबाबत सध्या बाधित रुग्णांवर प्रभावी उपचार करावे. या आजारावरील इंजेक्शन व औषधांचा मागणीनुसार पुरवठा सनियंत्रित करावा. कुठेही औषधाविना रुग्णांचे हाल होऊ नये. म्युकरमायकोसिस आजाराबाबत रुग्णालयांना स्वच्छतेबाबत सूचित करावे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. म्युकरमायकोसिस उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
गावागावांत विलगीकरण कक्ष स्थापन करा
तिसऱ्या लाटेत लहान मुलांवरील उपचारांसाठी बालरोगतज्ज्ञांची समिती तयार करावी. त्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. जिल्ह्यात बऱ्याच गावांनी लोकांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्ष स्थापन केलेले आहेत. या कक्षांत गावातील संशयीत रुग्णांना आणून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे कक्ष जिल्हा परिषदेने गावागावांत सुरू करण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
म्युकरमायकाेसिसचे जिल्ह्यात २७ रुग्ण
सध्या जिल्ह्यात म्युकरमायसिसचे २७ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील एकूण गावांपैकी ६४० गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आले असून, १३० गावांमध्ये आजपावेतो एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी दिली. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी उपस्थित होते.