भाषणाने सरकार चालत नाही!
By Admin | Published: August 13, 2016 01:06 AM2016-08-13T01:06:56+5:302016-08-13T01:06:56+5:30
खामगावात मुकूल वासनिक यांचे प्रतिपादन; कार्यकर्त्यांंची उपस्थिती.
खामगाव(जि. बुलडाणा), दि. १२: विकासाचे व्हिजन दाखवून नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली आहे. देशाच्या उन्नतीसाठी एका वर्षात २ कोटी नोकर्या निर्माण करून रोजगार देण्याचे आमिष दाखविले मात्र प्रत्यक्षात २0 हजारही नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. शेतकर्यांच्या मालाला भाव नाही. देशभर गोरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार होत असताना मोदी स्वत:ला गोळी मारण्याचे भाषण देतात. जनतेने गोळी झेलण्यासाठी नव्हे तर राज्य कारभार चालविण्यासाठी सत्तेवर बसविले आहे. तेव्हा केवळ मोठमोठी भाषणे देवून सरकार चालत नाही तर प्रत्यक्षात जनतेला न्याय देण्याचे काम करावे लागते असा घणाघाती टोला अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी लगावला.
खामगाव मतदार संघाचे माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदीरात काँग्रेसच्यावतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विधान परिषदेचे उपसभापती ना.माणिकराव ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष आ.राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ,माजी आ.दिलीपकुमार सानंदा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मुकुल वासनिक यांनी, मोदी सरकार विकासात्मक कामे न राबविता सुडबुध्दीचे राजकारण करीत आहे. काँग्रेसच्या काळात मनमोहनसिंग सरकारने शेतकर्यांना ७१ कोटी रूपयांचे कर्ज माफ केले. निर्यात दर वाढविला. शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहिली. मात्र मोदी सरकार केवळ भुलथापा देवून जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेरीत सरकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेला बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र घटनेला बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस हा डाव कदापिही सहन करणार नाही, असा इशाराही मुकुल वासनिक यांनी यावेळी दिला.