ऑनलाईन शिक्षणाने बिघडविले हस्ताक्षर अन् लिहिण्याची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:50+5:302021-03-29T04:20:50+5:30
विद्यार्थ्यांनो हे करा १ परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा, हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे. २ पेपर सोडवताना ...
विद्यार्थ्यांनो हे करा
१ परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा, हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे.
२ पेपर सोडवताना किंवा लिखाण करताना उंची नुसार योग्य टेबल खुर्चीचा वापर करणे.
३ दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करणे, परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे
आधी लिहिणे.
लिखाणाची वेळ वाढली!
नियमित शाळा सुरू असताना वर्गात शिकवताना शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले तितक्याच गतीने वहीवर लिहिण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली होती. गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्गात शिक्षक शिकवत होते आणि विद्यार्थी त्यांच्या सोयीने अभ्यास पूर्ण करत होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा वेग अगदीच मंदावला. वर्षभरात
याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन परीक्षेच्या काळात हाताचं दुखणं वाढत आहे.
ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका सोडविण्याचा सराव हा पूर्ण बंद झाला आहे. सराव उत्तरपत्रिका सोडवणे बंद झाल्याने सलग तीन तास बसून पेपर सोडवण्याची जी क्षमता व एकाग्रता लागते ती अतिशय कमी झाली आहे. दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर न झाल्यामुळे सलग तीन तासात ही मुले आता कसे पेपर सोडवतील हा एक प्रश्नच आहे, कारण सलग तीन तास पेपर सोडवण्यासाठी बसण्याची क्षमता मुलांमध्ये कमी होत चालली आहे. आता पालकांनीच आपल्या पाल्याचा पेपर सोडविण्याचा सराव व हस्ताक्षर सुधारण्यासाठी लक्ष द्यावे, म्हणजे मुले आत्मविश्वासाने येऊ घातलेल्या परीक्षांना सामोरे जातील.
नरेंद्र लांजेवार, पालक-बालक समुपदेशक बुलडाणा.
मोबाइलमधून दिलेले प्रश्न सोडविण्याकरिता विद्यार्थ्यांना वारंवार थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या लेखनाची गती कमी झाली आहे. शाळा सुरू असताना शिक्षकांनी सांगितलेले मुद्दे विद्यार्थी पटापट वहीत लिहून घ्यायचे. मात्र आता त्यांच्या लेखनाची सवय तुटली आहे. त्यामुळे त्यांचा तणाव वाढला आहे. यावर उपाययोजना म्हणून शुद्धलेखनाचा सराव आवश्यक आहे.
- किशोर वाघ, शिक्षक